Kadbanwadi Oxygen Park : कडबनवाडीत लोकसहभागातून साकारतंय ऑक्सिजन पार्क

एमपीसी न्यूज – सामाजिक उपक्रमांमध्ये नेहमीच अग्रेसर असणाऱ्या टाटा मोटर्स कंपनीच्या काही माजी कामगार व अधिकाऱ्यांच्या पुढाकार घेऊन इंदापूर तालुक्यातील कडबनवाडी या गावात ग्रामस्थांच्या सहभागातून एक मोठं काम करून दाखवलं आहे. वन खात्याच्या ओसाड टेकड्यांवर अवघ्या दोन वर्षांत तब्बल 1100 झाडांची नुसतीच लागवड केली नाही तर त्यांचे संगोपन करून गावातील पुढच्या पिढ्यांसाठी छानसं ‘ऑक्सिजन पार्क’ (Kadbanwadi Oxygen Park) विकसित केलं आहे. राज्यातील सर्वच गावांनी अनुकरण करावं असा आदर्शच कडबनवाडीच्या ग्रामस्थांनी घालून दिला आहे.

सामाजिक कार्याची मोठी परंपरा असलेल्या टाटा मोटर्स कंपनीच्या माजी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या एका स्नेहमेळाव्यात सुभाष पागळे यांनी पर्यावरण क्षेत्रात काम करण्याची संकल्पना मांडली. पर्यावरण क्षेत्रात आधीपासूनच काम करीत असलेले मुकुंद मावळणकर व विक्रम कुलकर्णी यांनी ती संकल्पना उचलून धरली आणि त्यातून कडबनवाडीत ऑक्सिजन पार्क साकारले. त्यांनी कडबनवाडीचे माजी सरपंच भजनदास पवार व अन्य ग्रामस्थांच्या मदतीने वन व वन्यजीव प्रतिष्ठान नावाची संस्था स्थापन केली. त्या माध्यमातून गावाच्या परिसरातील वनखात्याची सुमारे 1200 एकर ओसाड जमीन वनाच्छादित करून गाव कार्बनमुक्त करण्याचा संकल्प संस्थेने केला आहे.

कडबनवाडी हे गाव पुण्यापासून 135 किलोमीटर अंतरावर आहे. इंदापूर तालुक्यातील शेळगावची सुमारे दोन हजार लोकसंख्या असलेली ही वाडी आहे. वर्षाला सरासरी अवघा 400 मिलीमीटर पाऊस होणारा हा पर्जन्यछायेचा प्रदेश आहे. गावाच्या परिसरात बाभूळ आणि कडुनिंब याशिवाय अन्य झाडे दिसून येत नव्हती. या गावाजवळून भाटघर धरणाचा नीरा डावा कालवा वाहतो. त्यामुळे गावाच्या परिसरात बागायती शेती फुलली आहे. हे गाव डाळिंबाच्या पिकासाठी प्रसिद्ध आहे. अत्यंत उत्कृष्ट दर्जाची ही डाळिंबं औषधनिर्मितीसाठी परदेशात निर्यात होतात.

Maharashtra Monsoon : राज्यात मेघगर्जनेसह कोसळणार मान्सूनपूर्व सरी, विदर्भाला दिलासा नाही

बागायती शेतीमुळे आता गाव हिरवं दिसत असलं तरी गावाजवळ असलेली वनखात्याची तब्बल 1200 एकर जमीन मात्र ओसाडच होती. छोट्या- छोट्या टेकाडांच्या या उंच-सखल भूभागावर वनखात्याचे चिंकारा राखीव अभयारण्य आहे. या भागात चिंकारा जातीची हरणं तसंच खोकड, लांडगा, घोरपड हे प्राणी आणि वेगवेगळ्या जातीचे पक्षी मबलक प्रमाणात पाहायला मिळतात.

ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारे यांच्या महाराष्ट्र भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे पुणे जिल्हा समन्वयक असणाऱ्या भजनदास पवार यांनी पाणी फाऊंडेशनचे देखील काम प्रभावीपणे केलं आहे, अशा या गावाला साथ मिळाली ती टाटा मोटर्स कंपनीच्या काही निवृत्त वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची. पर्यावरण क्षेत्रात कामाची आवड असणाऱ्या या मंडळींनी ग्रामस्थांचे प्रबोधन करून त्यांना एक नवा दृष्टीकोन दिला आणि त्यातूनच जानेवारी 2020 मध्ये वन व वन्यजीव प्रतिष्ठानची स्थापना झाली.

भजनदास पवार हे या संस्थेचे अध्यक्ष असून मुकुंद मावळणकर हे सचिव तर सुभाष पागळे हे खजिनदार आहेत. सतीश गावडे गुरुजी, डॉ. एल. एस. कदम, ज्येष्ठ पत्रकार व लेखक सुरेशचंद्र वारघडे, विक्रम कुलकर्णी हे संचालक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत.

ग्रामवन प्रकल्पाचा फायदा

कडबनवाडी येथे ग्रामवन असल्याने स्थानिक वनव्यवस्थापन समितीला जागेच्या वापराबाबत संपूर्ण अधिकार होते. तरी देखील वन विभागाचे सहकार्य मिळणे देखील तितकेच महत्त्वाचे होते. तालुक्याचे आमदार व वन खात्याचे राज्यमंत्री दत्ता मामा भरणे यांनी ही संकल्पना उचलून धरली. एवढेच नाही तर या प्रकल्पातील पहिले झाड लावण्यासाठी स्वतः हजेरी लावली. वन व वन्यजीव प्रतिष्ठानने हा प्रयोग यशस्वी करण्यासाठी केलेल्या विविध उपाययोजनांचे वन विभागाने अन्य ठिकाणीही सुरू केले आणि त्याचा वन विभागाला देखील खूप फायदा झाला.

ऑक्सिजन पार्कची वैशिष्ट्ये

झाडं लावताना वड, पिंपळ, चिंच, करंजा, बहावा, जांभूळ अशा पारंपरिक व वैविध्यपूर्ण झाडांची लागवड करणे, आठ ते दहा फूट उंचीच्या रोपांची लागवड करणे, टँकर ऐवजी ठिबक सिंचन पद्धतीने झाडांना पाणी पुरवणे, ग्रामस्थांचेच पाण्यासाठी लाभलेले सहकार्य, चराईबंदी-कुऱ्हाडबंदीचे मनोमन पालन, देखभालीसाठी संस्थेच्या खर्चाने रखवालदाराची नेमणूक ही या ऑक्सिजन पार्कची (Kadbanwadi Oxygen Park) वैशिष्ट्ये आहेत.

कडबनवाडी परिसरात वनखात्याची 1200 एकर जमीन आहे. या जागेच्या कडेने अर्धा किलोमीटर रुंदीचा आणि 12 किलोमीटर लांबीचा घनदाट वृक्षांचा पट्टा विकसित करण्याचा वन आणि वन्यजीव प्रतिष्ठानचा संकल्प आहे. आता त्यापैकी केवळ एक किलोमीटर पट्ट्यात वृक्षलागवड झाली आहे. सध्याच्या गतीने हा संकल्प पूर्ण होण्यासाठी 10 ते 12 वर्षे लागू शकतात. पण लोकसहभाग वाढला तर हेच काम पाच ते सहा वर्षात पूर्ण करणं शक्य होणार आहे.

लोकसहभागासाठी आवाहन

ग्रामीण भागातील लोकांप्रमाणेच शहरातील वृक्षप्रेमी नागरिकांनी पुढे होऊन काही वृक्षांच्या रोपण व संगोपनासाठी यथाशक्ती योगदान द्यावे. Kadbanwadi Oxygen Park या उपक्रमात सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी 96899 16204 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन वन आणि वन्यजीव प्रतिष्ठानने केले आहे.

पूर्वी वनराई, देवराई, आमराई यामुळे वनांचे रक्षण व्हायचे. देवराईतील झाडं तोडली जात नसत, लाकूड फक्त प्रसादासाठीच वापरले जायचे. काळाच्या ओघात वनराया, देवराया नामशेष होत चालल्या आहेत. या पार्श्वभूमीवर वन विभाग आणि ग्रामस्थांच्या सहभागातून ग्रामवन विकसित करण्याचा कडबनवाडीतील प्रयोग निश्चितच दिशादर्शक ठरणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.