PCMC : ओपन जिमच्या साहित्यासाठी 66 लाखांचा खर्च

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेने (PCMC) शहरातील मैदाने, पदपथ अशा 34 ठिकाणी ओपन जिम ही संकल्पना राबवली आहे. त्यापैकी आठ ठिकाणी निविदा प्रसिद्ध न करता दरकरार पद्धतीने जिमसाठी साहित्य बसवून देण्यात येणार आहे. त्यासाठी 66 लाख रुपये खर्च होणार आहे.

पालिकेच्या शहरात 86 व्यायामशाळा आहेत. अ, ब आणि क या वर्गानुसार व्यायामशाळांचे धोरण तयार केले आहे. याशिवाय महापालिकेने शहरात ठिकठिकाणी उद्याने, मैदाने, पदपथ अशा ठिकाणीही ओपन जिम ही संकल्पना राबविली आहे. महापालिकेच्या क्रीडा विभागामार्फत आवश्यकतेनुसार विविध ओपन जिमसाठी साहित्य पुरवठा करून बसवून देण्यात येणार आहे. शहरात एकूण 34 ठिकाणी ओपन जिम उभारल्या आहेत. या जिमसाठी साहित्य आवश्यक आहे. यासाठी पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिची लिमिटेड यांना प्राप्त झालेली 70 लाख रुपये परतावा महापालिकेकडे वर्ग केला आहे.

ही रक्कम क्रीडा विभागाकडील क्रीडा व्यायाम साहित्य खरेदी या लेखाशीर्षावर सुधारित अंदाजपत्रकात वर्ग करण्यात येणार आहे. या तरतुदीच्या मर्यादेत ओपन जिम साहित्य पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेडमार्फत स्वतंत्र निविदा प्रसिद्ध न करता मध्यवर्ती भांडार विभागाने ओपन जिम साहित्य खरेदीसाठी दरकरार पद्धत अवलंबली आहे. या निविदेनुसार खरेदी करून साहित्य बसविण्यात येणार आहे. तसेच (PCMC) खरेदी खर्च तूर्त क्रीडा विभागाकडील लेखाशीर्षावर उपलब्ध नऊ कोटी तरतुदींपैकी शिल्लक तरतुदीतून करावा, अशी मागणी क्रीडा विभागाने केली आहे.

क्रीडा विभागाच्या मागणीनुसार 70 लाख तरतुदीच्या मर्यादित 13 प्रकारचे विविध ओपन जिम साहित्य प्रत्येकी 34 नग 34 ठिकाणी पुरवठा करून बसवून देण्यात येणार आहे. सध्या आठ ठिकाणांसाठी या साहित्याचा पुरवठा करण्याकरिता चार पुरवठादारांनी लघुत्तम दर सादर केले. त्यामध्ये पुण्यातील एड्यनिडस यांनी तीन बाबींसाठी प्रतिनग एकूण 2 लाख 37 हजार रुपये दर सादर केला. ठाण्यातील बाबा प्ले वर्ल्ड यांनी तीन बाबींसाठी प्रतिनग 1 लाख 58 हजार रुपये दर सादर केला. ठाण्यातील हनी फन एन थ्रील कंपनीने तीन बाबींसाठी 1 लाख 76 हजार रुपये आणि पुण्यातील त्रिमूर्ती इंजिनिअरिंग यांनी चार बाबींसाठी प्रतिनग एकूण 2 लाख 55 हजार रुपये असा दर सादर केला. त्यानुसार, एका सेटसाठी 8 लाख 27 हजार रुपये खर्च होणार असून, आठ ठिकाणी हे ओपन जिम साहित्य बसविण्यासाठी एकूण 66 लाख 21 हजार रुपये खर्च होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.