Pimpri News : कॅनरा आणि ऍक्सिस बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न; गस्तीवरील पोलिसांनी चोरट्यांना रंगेहाथ पकडले

एमपीसी न्यूज – खराळवाडी पिंपरी येथे शेजारी शेजारी असलेले कॅनरा आणि ऍक्सिस बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न झाला. गस्तीवरील पोलिसांच्या ही बाब लक्षात आल्याने पोलिसांनी चोरट्यांना अटक केली. ही घटना शुक्रवारी (दि. 11) मध्यरात्री दीड वाजताच्या सुमारास घडली.
चैतन्य पांडूरंग चौधर (वय 22) आणि भानुदास अण्णा दिघे (वय 23, दोघेही रा. कोयाळीगाव, आळंदीजवळ, ता. खेड, जि. पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलीस कर्मचारी स्वप्नील नंदकिशोर झणकर (वय 33) यांनी शुक्रवारी याबाबत पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर आवताडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, खराळवाडी येथे जुना पुणे मुंबई महामार्गावर कॅनरा आणि ऍक्सिस बँकेचे एटीएम सेंटर आहेत. शुक्रवारी मध्यरात्री दोन चोरटे पहार आणि पक्‍कडच्या सहाय्याने एटीएम फोडत होते. दरम्यान पिंपरी पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी रमेश दोरताले, स्वप्नील झणकर, प्रशांत जाधव आणि अमन सय्यद हे पिंपरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत होते.

पोलिसांना खराळवाडी येथील कॅनरा आणि ऍक्‍सिस बॅकेच्या एटीएममध्ये दोघेजण संशयास्पदरित्या आढळून आले. पोलिसांनी जवळ जाऊन पाहणी केली असता ते एटीएम फोडत असल्याचे समोर आले. पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.