`Pimpri Corona News: पहिला डोस घेतलेल्या 5549 तर दुसरा डोस घेतलेल्या 3381 जणांना कोरोनाची लागण

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना प्रतिबंधक लस घेतलेल्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. लसीचा पहिला डोस घेतलेल्या शहरातील 5 हजार 549 तर दुसरा डोस घेतलेल्या 3 हजार 381 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. लस घेणा-यांना लागण होण्याचे प्रमाण खूप कमी आहे. जिल्हा आरोग्य अधिका-यांनी 13 जानेवारीपर्यंतच्या दिलेल्या माहितीनुसारची ही आकडेवारी आहे. दरम्यान, कालपर्यंत शहरातील 31 लाख 47 हजार 46 जणांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात 1 जानेवारीपासून कोरोनाच्या रुग्णसंख्येत प्रचंड वाढ होत आहे. दिवसाची रुग्णसंख्या अडीच हजाराच्या पुढे गेली आहे. कोरोना प्रतिबंधक लसीचा एकही डोस न घेतलेल्यांना लागण होण्याचे प्रमाण जास्त आहे. बाधितांपैकी तब्बल 82 टक्के लोकांनी एकही डोस घेतली नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. तर, शहरातील 31 लाख 47 हजार 46 जणांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली आहे. 17 लाख 823 लोकांनी पहिला डोस घेतला आहे. त्यातील 5 हजार 549 जणांना कोरोनाची लागण झाली. तर, 13 लाख 98 हजार 36 जणांनी डोस घेतला आहे. त्यापैकी 3 हजार 381 जणांनी कोरोनाची लागण झाली आहे. लस घेतल्यानंतरही कोरोनाची लागण होते. परंतु, प्रकृती गंभीर होत नसल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांकडून सांगितले जाते.

पिंपरी-चिंचवड शहरात महापालिकेची 272 आणि खासगी 156 अशी 428 लसीकरण केंद्रे आहेत. महापालिकेकडे कोविशिल्डचे 1 लाख 25 हजार 750 तर कोव्हॅक्सीनचे 18 हजार 950 डोस शिल्लक आहेत. त्यामुळे ज्या नागरिकांनी पहिला डोस घेतला नाही. त्यांनी तातडीने डोस घ्यावा. ज्यांच्या दुस-या डोसची तारीख झाली. त्यांनीही दुसरा डोस घ्यावा असे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे.

शहरातील 1 हजार 815 दिव्यांग नागरिकांचे लसीकरण झाले. 196 तृतीयपंथी, 1 हजार 229 गरोदरमातांनी लस घेतली. अंथारुणाला खिळून असलेल्या 414, परदेशात शिक्षणासाठी जाणा-या 1 हजार 727 मुलांचे लसीकरण झाले. औद्योगिक क्षेत्रातील 1 लाख 90 हजार 228, इतर 13 लाख 9 हजार 303 आणि 60 वर्षावरील 2 लाख 95 हजार 61 जणांनी लस घेतली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.