Pimpri News: कोरोनाच्या संकटकाळातही भाजप, भांडार विभागाकडून महापालिकेची लूट- नाना काटे

Pimpri News: Even during the crisis of Corona, BJP and Store department looted PCMC- Nana Kate महापालिकेच्या कोरोनाच्या नावाखाली एकीकडे शिक्षण विभागाकडून तर दुसरीकडे भांडार विभागाकडून कोट्यवधींच्या खरेदीचा घाट घातला आहे.

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या संकटकाळातही पैसे कमावण्याची एकही संधी पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजप आणि भांडार विभागाकडून सोडली जात नाही. काही ठराविक ठेकेदारांना हाताशी धरून महापालिकेची लूट करण्याचे काम स्थायी समिती व प्रशासनातील काही अधिकारी करत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी केला आहे.

याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नाना काटे यांनी म्हटले की, महापालिकेच्या कोरोनाच्या नावाखाली एकीकडे शिक्षण विभागाकडून तर दुसरीकडे भांडार विभागाकडून कोट्यवधींच्या खरेदीचा घाट घातला आहे. यातून सत्ताधारी भाजप पक्षाकडून कोट्यवधीची उधळपट्टी सुरू आहे.

कोणतीही निविदा प्रक्रिया न राबविता थेट पद्धतीने खरेदी करण्यात आली आहे. भांडार विभागाने वाढीव दराने खरेदी करुन भ्रष्टाचाराचा कहर केल्याचेच दिसून येत आहे. शाळा बंद असतानाही शालेय साहित्य खरेदी केली जात आहे.

महापालिकेकडून प्रत्येक कामात खरेदीसाठी निविदा प्रक्रिया राबविली जात असताना कोरोना आडून कोट्यवधी रक्कमेच्या खरेदीसाठी निविदा प्रक्रिया का राबविण्यात आली नाही? काही ठेकेदाराच्या आग्रहाखातर आणि काही ठराविक राजकीय आणि अधिकाऱ्यांच्या आर्थिक हितसंबंधासाठी थेट खरेदीचा घाट घालून जनतेच्या पैशाचा अपव्यय थांबवा अशी मागणी काटे यांनी केली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.