Pimpri News: ‘संतपीठ, पाणीपुरवठा, कुत्र्यांच्या नसबंदीत भ्रष्टाचार करणा-या दरोडेखोर भाजपला जनता सत्तेतून पायऊतार करणार’

सामान्य जनतेच्या अभिरुप महासभेत महाविकास आघाडीच्या नगरसेवकांचा भाजपवर हल्लाबोल

एमपीसी न्यूज – महापालिकेतील सत्ताधारी भाजपला शहरवासीयांना दररोज पाणी देता आले नाही. अमृत योजनेचे वाटोळे केले. पवना जलवाहिनी बाबत शहरात एक बोलायचे आणि मावळात दुसरेच हा भाजपाचा दुट्टप्पीपणा आहे. भाजपच्या भ्रष्टवृत्तीमुळे आंद्रा, भामा-आसखेड धरणाचे पाणी अजूनही आणता आले नाही. भाजप आमदारांचे भाच्चे, भाऊ, साडूंसाठी निविदांमध्ये रिंग केली. निविदेच्या रकमा वाढविल्या. संतपीठ, स्मार्ट सिटी, कुत्र्यांची नसबंदी, सफाई कामगार, अर्बन स्ट्रीटच्या गोंडस नावाखाली कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार केला. भाजपने पाच वर्षात नात्यागोत्यांना पोसण्याचे काम केले. शहराची दोन भागात विभागणी केली. मोशीतील कचरा डेपो आमदारांच्या भ्रष्टाचाराचा अड्डा झाला आहे. भ्रष्टाचारावर बोलण्याची हिंमत नसल्यानेच व आपले पितळ उघडे पडेल या भितीने भाजपने शेवटची सभा टाळल्याचा हल्लाबोल विरोधी पक्षातील नगरसेवकांनी सामान्य जनतेच्या अभिरुप महासभेत केला.

सभेच्याशेवटी भाजपच्या पापातून मुक्त होण्यासाठी अभिरुप महासभेच्या महापौर सुलभा उबाळे यांनी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा आणि महापौरपदाचाही राजीनामा दिला. पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपने 18 फेब्रुवारीची शेवटीची महासभा नगरसेवकांचा कार्यकाळ संपल्यानंतर म्हणजेच 17 मार्चपर्यंत तहकूब केली. 13 मार्च रोजी नगरसेवकांचा कार्यकाळ संपणार असल्याने 17 मार्च रोजीची सभा होऊ शकणार नव्हती. त्यामुळे विशेष सभा घेण्याची मागणी करुनही भाजपने शेवटची सभा घेतली नाही.  याचा निषेध करण्यासाठी आणि आयुक्तांनी मांडलेला अर्थसंकल्प आहे तसा प्रशासक या नात्याने तो मंजूर करावा या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना यांच्या वतीने आज (शनिवारी)पिंपरीतील आचार्य अत्रे सभागृहात सामान्य जनतेची महासभा आयोजित केली होती. अभिरुप सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर म्हणून माजी नगरसेविका सुलभा उबाळे, आयुक्त म्हणून काँग्रेसचे शहराध्यक्ष  कैलास कदम तर नगरसचिव म्हणून माजी नगरसेवक प्रशांत शितोळे यांनी कामकाज पाहिले. सभागृहात आमदार अण्णा बनसोडे, माजी आमदार विलास लांडे, माजी महापौर कविचंद भाट, संजोग वाघेरे यांच्यासह राष्ट्रवादी, शिवसेनेचे नगरसेवक उपस्थित होते.

स्मार्ट सिटी, निविदेतील रिंग, कुत्र्यांच्या नंसबदीतील भ्रष्टाचार, संतपीठ, कचरा संकलन, अनधिकृत होर्डिंग्ज, डॉक्टर भरती, अर्बन स्ट्रीट, खरेदी अशा 9 कामातील भ्रष्टाचाराची माहिती जनतेला दिली. बरोबर 12 वाजून 5 मिनिटांनी सभा सुरु झाली. सुरुवातीलाच भाजपच्या भ्रष्ट कारभाराचा निषेध करुन सभा 10 मिनिटांसाठी तहकूब केली. नियमित सभेप्रमाणेच या अभिरुप सभेचे कामकाज चालले. पुन्हा सभा कामकाज सुरु होताच महिला नगरसेविकांनी शहरातील पाणीपुरवठ्याच्या प्रश्नाकडे लक्ष वेधले. चार दिवसांपासून पाणीपुरवठा विस्कळीत आहे. टँकर लॉबीसाठी हा प्रश्न निर्माण केल्याचा आरोप केला. भाजपने पाण्यातही भ्रष्टाचार करण्याचे सोडले नाही. अमृतच्या कामात 200 कोटींचा भ्रष्टाचार केला. भाजप जाहीरानाम्यातील एकही आश्वासन पूर्ण करु शकले नाही. आंद्रा, भामा-आसखेड धरणातून पाणी आणण्यासाठीच्या बंद पाईपलाईनचे काम रिंग करुन जवळच्या लोकांना द्यायाचे होते. त्यासाठी पुणे महापालिकेसोबत एकत्रित पाईपलाईन टाकली नाही. त्यामुळे आज पाण्याची ही अवस्था निर्माण झाली. खुर्ची पाहिजे म्हणून पक्ष बदलला, आदेशावरुन कामकाज करत असल्याचे सांगत महापौरांनाही टोले लगाविले.

स्मार्ट सिटीत 1100 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केला आहे. भाजपचा एक आमदार, शहरातील भाजप आमदारांचे नातलग उपठेकेदार म्हणून काम करत आहेत. स्मार्ट सिटीच्या कामाला तांत्रिक मान्यता न घेता नियम धाब्यावर बसविले. प्रामाणिक प्राणी असलेल्या श्वानाच्या नसबंदीतीही पैसे खाण्याचे सोडले नाही. डॉक्टर, पती-पत्नी एकत्रीकरणातही पैसे खालल्ले. स्मार्ट सिटीच्या बाता मारल्या जातात. पण, झोपडपट्यांमधील प्रश्नांकडे कोणी लक्ष देत नाही. भाजपने केवळ दरोडे टाकण्याचे काम केले. भाजपला प्रामाणिक श्वानही माफ करणार नाही. हायवेच्या अलीकडचा आणि पलीकडचा या दोन ठेकेदारांनी शहर लुटले आहे. या दोघांनीच सत्ता चालविली. संतपिठाचे 40 कोंटीचे काम भाजपने ठेकेदारांना रिंग करायला लावून 45 कोटी रुपयांवर नेले. या पवित्र कामासाठी वारकरी सांप्रदयात सर्वोच्य स्थान असलेल्या नामांकित लोकांचे नाव, अनुभव, प्रतिष्ठेचा फक्त वापर केला. आता त्यांना बाजूला केल्याने वारक-यांच्या भावनेला ठेच पोचवून कार्यकर्त्यांची सोय लावली. त्याचे प्रायश्चित भाजपला भोगावे लागेल. भाजपने न भूतो न भविष्यती भ्रष्टाचार केला आहे. शहर भाजपने भ्रष्टाचार कसा करावा याचे विद्यापीठ स्थापन करावे असा सल्ला देत भाजपच्या रुपाने शहराला लागलेला काळा डाग आगामी निवडणुकीत जनता नक्कीच पुसून काढेल असा विश्वास नगरसेवकांसह सामान्य नागरिकांनी व्यक्त केला.

महापालिकेतील विविध कामातील भ्रष्टाचाराबातची सदस्य, नागरिकांनी दिलेली माहिती ऐकून घेतल्यानंतर अभिरुप सभेच्या महापौर सुलभा उबाळे यांनी भ्रष्टाचाराचा निषेध करुन भाजपच्या पापातून मुक्त होण्यासाठी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा आणि महापौरपदाचा राजीनामा दिला. भाजपच्या दबावाखाली काम करणारे आयुक्तही त्या पदासाठी पात्र नाहीत. ज्या विषयांमध्ये आरोप झाले. त्याचा खुलासा करण्याचे आदेश त्यांनी आयुक्तांना दिले.

अभिरुप सभेचे आयुक्त कैलास कदम म्हणाले, ”भ्रष्टाचाराचे आरोप गंभीर आहेत. सोमवारपासून प्रशासकीय राजवट असणार आहे. नगरसेवक, सामान्य नागरिकांनी केलेल्या सर्व आरोपांची सखोल चौकशी केली जाईल. दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल.

या अभिरुप सभेत राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष, नगरसेवक अजित गव्हाणे, माजी महापौर योगेश बहल, मंगला कदम, वैशाली घोडेकर, अपर्णा डोके, नगरसेवक भाऊसाहेब भोईर, विनोद नढे, कैलास बारणे, विक्रांत लांडे, पंकज भालेकर, पोर्णिमा सोनवणे, प्रज्ञा खानोलकर, अनुराधा गोफणे, वैशाली काळभोर, माया बारणे, तुषार कामठे, वसंत बोराटे, राजेंद्र जगताप, अतुल शितोळे, काळूराम पवार, सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर, बाबा कांबळे, रविंद्र सिंग आदींनी आपली मते मांडली. विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, रवि लांडगे, शिवसेना शहरप्रमुख सचिन भोसले, प्रमोद कुटे, निलेश बारणे, नवनाथ जगताप, राहुल भोसले, मोरेश्वर भोंडवे, मयूर कलाटे, श्याम लांडे, समीर मासूळकर, जगदीश शेट्टी, उषा वाघेरे, संगीता ताम्हाणे, पंडीत गवळी, महिला अध्यक्षा कविता आल्हाट, युवक अध्यक्ष इम्रान शेख  यांच्यासह सर्व नगरसेवक, माजी नगरसेवक, नगरसेविकांनी अभिरुप सभेला हजेरी लावली.

राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे म्हणाले, ”सत्ताधारी भाजपने मागील पाच वर्षात एकही आश्वासन पूर्ण केले नाही. केवळ भ्रष्टाचार केला. भ्रष्टाचाराच्या आरोपातून पळ काढण्यासाठी शेवटची सभा देखील भाजपने घेतली नाही. इतिहासात पहिल्यांदाच असे झाले. भाजपचा भ्रष्ट कारभार जनतेसमोर आणण्यासाठी आजची अभिरुप महासभा घेतली होती. भाजपच्या भ्रष्टाचाराची आगामी काळात नक्कीच चौकशी होईल”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.