Pimpri News: महापालिकेच्या विकास कामांचे उद्घाटन करणा-या चंद्रकांत पाटील यांच्याकडे कोणते संवैधानिक पद?

राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांचा महापौरांना सवाल

एमपीसी न्यूज – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केलेला मेट्रो प्रकल्पाचा पाहणी दौरा भाजप आणि त्यांच्या नेत्यांना चांगलाच झोंबला. मेट्रोच्या श्रेयासाठी चाललेली भाजपची धडपड स्पष्ट दिसत आहे.

पवार साहेबांवर आरोप करताना भाजपच्या नेत्यांनी आपली राजकीय उंची तपासावी. ते राज्यसभेचे खासदार आहेत. त्यामुळे त्यांनी मेट्रोसारख्या केंद्र व राज्याच्या निधीतून प्रकल्पाची पाहणी करण्यात गैर काय ? असा सवाल करत पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विकासप्रकल्पाचे भूमिपूजन, उद्घाटन करणा-या भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे कोणते संवैधानिक पद आहे, असा प्रतिप्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे ‌यांनी महापौरांना विचारला आहे.

शरद पवार यांनी सोमवारी (दि. 17) पुणे महामेट्रोला भेट देऊन प्रकल्पाची पाहणी केली. त्यांनी फुगेवाडी ते पिंपरीपर्यंत मेट्रोतून प्रवास केला. परंतु, शरद पवार यांनी मेट्रोला दिलेल्या भेटीवरून सत्ताधारी भाजपने राजकारण सुरू केले आहे. लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेता कोणत्याही प्रकारचे वैधानिक पद नसलेल्या तसेच ठराविक पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांना डोळ्यासमोर ठेऊन महामेट्रोचा मनमानी कारभार सुरु असल्याचा आरोप महापौर उषा ढोरे यांनी केला होता.

त्यावर प्रत्युत्तर देताना संजोग वाघेरे‌ म्हणाले की, पुणे, पिंपरी-चिंचवड शहरातील मेट्रो प्रकल्पाची मुहूर्तमेढ काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात रोवली गेली. या प्रकल्पात केंद्र, राज्य सरकार आणि महापालिकेचा आर्थिक हिस्सा आहे. करदात्यांच्या खर्चातून हा मेट्रो प्रकल्प साकारत आहे. मेट्रो किंवा ठराविक कोणता प्रकल्प म्हणजे भाजपची मक्तेदारी नाही. शरद पवार हे देशाचे नेते असून ते राज्यसभेचे खासदार आहेत. त्यामुळे त्यांनी केंद्र व राज्य सरकारच्या कोणत्याही प्रकल्पाला भेट दिली तर बिघडलं कुठं ?

महामेट्रोच्या व्यवस्थापनाने शरद पवार यांच्या अनुभवाचा, ज्ञानाचा विचार करून या दौ-याचे नियोजन केले. त्यांच्या सूचना स्वीकारल्या. पण, भाजपच्या मंडळींना मिरच्या का झोंबल्या आहेत ? भाजपने देशात सगळीकडे कुरघोडीचे राजकारण केले आहे. इथेही श्रेयासाठी चाललेली भाजपची धडपड दिसते. आतापर्यंत मेट्रोच्या पाहणीसाठी भाजपला कोणी अडवले होते ? उलट ज्या शहराने आणि मतदारांनी सत्ता दिली. त्यांच्यासाठी भाजपच्या नेत्यांना शहरात येण्यासाठी वेळ नाही. आपले अपयश झाकण्यासाठी इतरांवर टीका करण्याचा हा उद्योग भाजपने थांबवावा, असेही वाघेरे म्हणाले.

कोणाच्या आशिर्वादाने उपमहापौर, स्थायी समिती अध्यक्ष झाला होतात?

राजशिष्टाचार आणि संवैधानिक पदाचा अवमान झाल्याचे सांगून शहराच्या महापौरांनी महामेट्रोचा निषेध केला. महापौरासारख्या महत्त्वाच्या पदाधिका-यांनी शिष्टाचार समजून घ्यावा. महापौर होण्यापूर्वी आपण कोणत्या पक्षाकडून आणि कोणाच्या आशिर्वादाने उपमहापौर, स्थायी समिती अध्यक्ष झाला होतात ? हे शहराला सांगावे आणि आपण कोणावर टीका करतो आहोत ? याचे थोडे भान शहराच्या महापौर म्हणून ठेवावे. कोणाच्या तरी सांगण्यावरून महापौरपदाची गरिमा घालवू नये, असा उपरोधिक सल्ला संजोग वाघेरे यांनी पिंपरी-चिंचवडच्या महापौरांनाही दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.