Pimpri News : उजनी जलाशयातील प्रदूषणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर! पर्यावरण तज्ज्ञ म्हणतात…

एमपीसी न्यूज – उजनी जलाशयात पुणे, पिंपरी-चिंचवड परिसरातून येणाऱ्या दूषित पाण्यामुळे धरणातील पाणी प्रदूषित झाले आहे. उजनीतील पाण्यात घरगुती सांडपाण्याशी संबंधित घटक मर्यादेपेक्षा अधिक आढळून आल्यामुळे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून पिंपरी-चिंचवड महापालिकेविरोधात न्यायालयात दावा दाखल करण्यात आला आहे. तर, पुणे महापालिकेचे जवळपास 15 कोटी रुपये गोठवले आहेत. त्यामुळे शहरातील सांडपाण्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. याबाबत ‘एमपीसी न्यूज’ने पर्यावरण तज्ज्ञांशी संवाद साधला.

…तेवढा दंड पाणी प्रदूषित करणा-यांकडून वसुल करावा – नरेंद्र चूग

जलबिरादारीचे नरेंद्र चूग म्हणाले, ”केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने दंड आकारणाचा एक फॉर्म्युला दिला आहे. त्याप्रमाणे दंड आकारला पाहिजे. औद्योगिक रसायनमिश्रित पाणी, सांडपाणी टाकून पाण्याचे स्त्रोत खराब केले जात आहे. शहरातील प्रदूषित पाण्यामुळे उजनी धरणातील पाणी पिण्यायोग्य राहिले नाही. तिथे मासेही राहू शकत नाहीत. दूषित पाण्यामुळे मासेमारी करणारे लोक आजारी पडत आहेत. सांडपाण्यामुळे पाण्यातील नवस्पती सुद्धा जगू शकत नाही”.

”केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या फॉर्म्युल्यानुसार जलाशयाला पूर्वीसारखा दुरुस्त करण्यास जेवढा खर्च येईल. तेवढा दंड पाणी प्रदूषित करणा-यांकडून वसुल केला पाहिजे अशी मागणी” करत चूग पुढे म्हणाले, ”उजनीतील पाणी प्रदूषित करण्यात पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिकेचा 80 टक्के वाटा आहे. त्यामुळे दंड लावून पळवाट करुन देऊ नये. सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारणार असल्याचे महापालिका 20 वर्षांपासून सांगत आहेत. पण, ते करत नाहीत. त्यासाठी मुदत देऊन महापालिकांकडून सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारुन घेतले पाहिजेत. शहरात निर्माण होणा-या संपूर्ण सांडपाण्यावर प्रक्रिया केली जात नाही. ज्या पाण्यावर प्रक्रिया केली जाते, ती व्यवस्थित केली जात नाही”.

”आता नदी सुधार प्रकल्पाअंतर्गत केवळ घाट बांधले जाणार आहेत. नदी तर अशुद्धच वाहणार आहे. अशुद्ध पाण्यावर चांगले घाट बांधून उपयोग काय होणार नाही. दुर्गंधीत जाऊन कोण बसणार आहे. प्राथमिकता पाणी शुद्ध करण्याला द्यावी. अगोदर नदीला शुद्ध करावे. त्यानंतर घाट बांधावेत. नदी सुधार प्रकल्पाअंतर्गत नदीला स्वच्छ करणार असल्याचे सांगून लोकांना भ्रमित केले जात आहेत. पाणी शुद्ध करावे. पाणी वाहन क्षमतेला कमी करु नये ही आमची भूमिका आहे. नदीकाठी बांधकामे करण्यास परवागी देऊ नये”, असेही ते म्हणाले.

प्रत्येक थेंब सांड पाण्यावर प्रक्रिया करावी – रवी सिन्हा

भूजल अभियानाचे रवी सिन्हा म्हणाले, ”पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिकेने नदी सुधार प्रकल्प करण्याचा घाट घातला आहे. या प्रकल्पामुळे नदी प्रदूषित होण्याचा प्रश्न मार्गी लागणार नाही. नदी सुधार प्रकल्प हा उपाय नाही. अगोदर मुळा,मुठा, पवना, इंद्रायणी या नद्या, नाल्यांमध्ये येणारे प्रदूषित पाणी रोखले पाहिजे. सांडपाण्यावर प्रक्रिया करुन पाणी स्वच्छ केले पाहिजे. प्रत्येक थेंब सांड पाण्यावर प्रक्रिया करावी. इंदौर शहराने तसे केले आहे. पण, आपल्याकडे तसे न करता नदी सुधार प्रकल्पाच्या माध्यमातून नदीपात्रात बांधकाम करणे, जमिन मालकाला समृद्ध करायचे काम केले जात आहे. प्रदूषित पाणी सोडल्याप्रकरणी संबंधित अधिका-यांवर गुन्हे दाखल केले पाहिजेत. त्याशिवाय मनमानी थांबणार आहे. नदी सुधार प्रकल्पाला आमचा पूर्णपणे विरोध आहे. पूर्वीसारखी नदी सुधारावी अशी आमची मागणी आहे”.

नदी प्रदूषण रोखण्यासाठीच्या उपाययोजना प्रगतीपथावर – अतिरिक्त आयुक्त वाघ

पिंपरी-चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ म्हणाले, ”महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रणमंडळाच्या निकषांचे पालन करण्यासाठी ज्या काही पायाभूत सुविधा लागतील. त्या केल्या जात आहेत. सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांची संख्या वाढविणे, जास्त क्षमतेचे प्रकल्प उभारले जाणार आहेत. नदी सुधार प्रकल्पही राबविला जाणार आहे. मोठ्या प्रमाणात सांडपाणी तयार होणा-या गृहनिर्माण सोसायट्यांमधील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प सुस्थितीत राहतील. या अनुषंगाने त्यांचा ड्राईव्ह घेणे. ‘एसटीपी’ उभारण्यासाठी सोसाट्यांना प्रोत्साहन दिले जाणार आहे. या उपयाययोजना प्रगतीपथावर आहेत. नदीत होणारे प्रदूषण कमी करण्यासाठी शक्य तेवढे प्रयत्न केले जाणार आहेत. नदी प्रदूषणाला केवळ महापालिकाच जबाबदार नाही”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.