Bhosari News : ‘एका बैलास महिन्याला 15 हजारांचा खर्च, 7 वर्षे चारा विकत घेऊन केले चार बैलांचे संगोपन’

एमपीसी न्यूज – सर्वोच्च न्यायालयाने नुकतेच बैलगाडा शर्यतीला सर्शत परवानगी दिली आहे. अनेक वर्षे प्रलंबित असलेल्या या निर्णयानंतर बैलगाडा मालकांनी मोठ्ठा जल्लोष करत, सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानले. 2017 साली मुंबई हायकोर्टानं बैलगाडा शर्यतींवर बंदी घातली होती. याला राज्य सरकारनं सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. आता या शर्यतींना सशर्त परवानगी देण्यात आली आहे. सात वर्षांनंतर या निर्णयामुळं बैलगाडा शर्यत पुन्हा राज्यात सुरु होणार आहे. 

बैलगाडा शर्यतीला परवानगी दिल्याने पुन्हा एकदा सर्जा राजाची जोडी धावताना दिसेल, आणि भिर्रर्रचा नारा आसमंत दणाणून सोडेल. याच पार्श्वभूमीवर भोसरीतील प्रकाश मामा धावडे या बैलगाडा मालकाच्या भावना जाणून घेण्याचा ‘एमपीसी न्यूज’ने प्रयत्न केला.

प्रकाश मामा धावडे म्हणाले, ‘आमच्यासाठी हा खूप मोठा आणि दिलासा देणारा निर्णय आहे. बैलगाडा शर्यत आमच्या साठी नेहमीच अग्रस्थानी राहिली आहे. काल निर्णय आल्यानंतर आम्ही भव्य मिरवणुक काढून जल्लोष केला व सर्वोच्च न्यायालय आणि या साठी लढा देणा-या सर्वांचे आभार मानले. सात वर्षे यासाठी वाट पाहिली.’

‘शर्यतीच्या बैलांचे संगोपन हे काम खर्चिक आणि जबाबदारीचे आहे. मागील सात आम्ही चार बैल आणि एक घोडी यांच्या संगोपनासाठी वैरण/ चारा विकत घेतला. आम्हाला शेती नसल्याने तो विकतच घ्यावा लागतो. एका बैलाला एका महिन्याला किमान पंधरा हजार रुपये खर्च होतात. सकारात्मक निर्णयाची आम्हाला अपेक्षा होती, आणि तो सकारात्मकच आला याचा आनंद आहे. लवकरच पुन्हा भिर्रर्रचा नारा सुरू होईल. जत्रा, यात्रा, ऊरुस यामध्ये शर्यतीचे मोठे आकर्षण असते, यामुळे इतर अनेकांना देखील रोजगार मिळतो,’ असे तळेगाव दाभाडे येथील सागर दाभाडे यांनी सांगितले.

बैलगाडा शर्यत सुरू करण्यासाठी संदीप बोदगे, रामकृष्ण टाकळकर, शेवाळे आबा, बाळासाहेब व इतर सहकारी, भोसरी येथील बैलगाडा संघटना संघर्ष ग्रुप, कातवी येथील यशवंत ग्रुप यांनी विशेष परिश्रम घेतले, असे दाभाडे यांनी नमूद केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.