DC vs RR : राजस्थान रॉयल्सने पाचव्या विजयासह दिल्ली कॅपिटल्सवर केली रोमहर्षक मात

(विवेक दि. कुलकर्णी) : राजस्थान रॉयल्स संघाला या स्पर्धेत चांगलाच सूर सापडला आहे,त्याचाच फायदा उठवत आज त्यांनी दिल्ली कॅपिटल्सला 15 धावांनी नमवत आणखी एक विजय मिळवताना अंकतालिकेत प्रथम क्रमांक मिळवत प्ले ऑफ साठी आपला दावा मजबूत केला आहे.या हंगामातले आपले तिसरे शतक ठोकणारा जोस बटलर सामन्याचा मानकरी ठरला.

प्रचंड फॉर्मात असलेल्या जॉस बटलरचे आयपीएल मधले विक्रमी शतक,त्याने दैवदत्त पडीकलसोबत केलेली राजस्थान रॉयलसाठीची आजवरची सर्वोच्च सलामीच्या भागीदारीच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने प्रथम फलंदाजी करताना आपल्या 20 षटकात दोन  गड्याच्या 222 मोबदल्यात  धावा करून दिल्ली कॅपिटल्स पुढे मोठे आव्हान उभे केले.ज्याचा पाठलाग करताना दिल्ली संघाची चांगलीच दमछाक झाली.

पंत, शॉ,ललीत आणि शेवटच्या षटकात पॉवेलने सामन्यात काही प्रमाणात रंगत निर्माण केली असली तरी संजू सॅमसनने कमालीची शांतता राखत उत्तम नेतृत्व करत बाजी मारली. दिल्ली कॅपिटल्सच्या डावाच्या शेवटच्या षटकात पॉवेलने आक्रमक फलंदाजी करताना मकायच्या गोलंदाजीवर पहिल्या तीन चेंडूत तीन षटकात मारत सनसनाटी माजवली, याच दरम्यान मकायचा एक चेंडू नोबॉल असल्याचा दावा दिल्लीकरांनी  केला, मात्र तो बॉल पंचांनी योग्य ठरवल्यानतंर पंतने मैदानातल्या खेळाडूना परत बोलावले आणि सामन्यात एकच खळबळ माजली, पंतची कर्णधार म्हणून ही कृती खिलाडूभावनेच्या दृष्टीने अतिशय चुकीची होती, अखेर त्याला आपली चूक उमगली आणि सामना कुठल्याही वादाविना पार पडला.

मुंबईच्या वानखेडे मैदानावर झालेल्या आजच्या दिवसरात्र सामन्यात दिल्ली  कॅपिटल्स संघाचा कर्णधार ऋषभ पंतने नानेफेकीचा कौल आपल्या बाजूने लागताच प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला खरा,पण जॉस बटलर आणि देवदत्त पडीकल या जोडीने पहिल्या गड्यासाठी विक्रमी सलामी भागीदारी जोडून हा निर्णय पूर्णपणे चुकीचा ठरवला,155 धावा पहिल्या गड्यासाठी जोडल्यानंतर अखेर पडीकल आपले अर्धशतक पूर्ण करुन खलील अहमदच्या गोलंदाजीवर पायचीत  झाला.

पडीकलचे हे सातवे अर्धशतक ठरले. तो बाद झाल्यानंतर जॉस बटलरने आपले वैयक्तिक चौथे आणि या हंगामातले विक्रमी शतक पूर्ण करताच इतिहास रचला. मोठमोठे भारतीय फलंदाज अपयशी ठरत असतानाच जॉस बटलरची सातत्यपूर्ण फलंदाजी डोळ्याला दिपवणारी आहे.65 चेंडूत 116 धावा करुन बटलर बाद झाला,(यामध्ये 8 उत्तुंग षटकार आणि 9 चौकार सामील होते) पण तोवर त्याने राजस्थानसाठी एकदम रॉयल कामगिरी करुन आपली जबाबदारी एकदम चोख पार पाडली होती.

त्यानंतर या वाहत्या गंगेत संजू सॅमसननेही हात धुवून घेतले आणि केवळ 19 चेंडूत नाबाद 45 धावा करत दिल्ली गोलंदाजीला पुरते हतबल करुन टाकले.या धडाकेबाज फलंदाजीमुळे दिल्ली संघापुढे राजस्थान रॉयल्सने 223 धावांचे विशाल लक्ष्य उभे करण्यात यश मिळवले.साहजिकच आशा आक्रमक फटकेबाजीमुळे दिल्ली कॅपिटल्सच्या गोलंदाजांचे पृथक्करण बिघडले नसते तरच नवल,त्यातल्या त्यात खलील आणि मुस्तफिजूरने प्रत्येकी एक गडी बाद करण्यात यश मिळवले.

या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्ली संघाची सुरुवात वॉर्नर आणि पृथ्वी शॉने 4.3षटकातच 43 धावांची जोरदार  आणि आक्रमक सलामी दिली पण ही आक्रमकता जास्त वेळ चालली नाही ,लागोपाठ तीन अर्धशतके करणारा वॉर्नर तो फॉर्म आज संघाला गरज असताना दाखवू शकला नाही 14 चेंडूत 28 धावा काढुन प्रसिद्ध कृष्णाच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. पाठोपाठ सर्फराज खानही स्वस्तात बाद झाला आणि दिल्ली संघ चांगलाच अडचणीत आला.

पंत आणि पृथ्वी शॉ ने बऱ्यापैकी भागीदारी करत डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण  51 धावांची वेगवान भागीदारी झाल्यानंतर पृथ्वी शॉ  आक्रमक फटका मारण्याच्या नादात आपली विकेट देवून बसला आणि हा सामना पूर्णपणे राजस्थानच्या बाजूने झुकला.तो  27चेंडूत 37 धावा करुन प्रसिद्ध कृष्णाच्या गोलंदाजीवर बाद झाला. आतापर्यंत आपली विकेट राखत खेळणारा ऋषभ पंतसारखा आक्रमक फलंदाजही या पडझडीने दडपणाखाली गेला आणि कृष्णाच्या गोलंदाजीवर 44 धावा काढून झेलबाद झाला.

यावेळी दिल्लीची अवस्था 12 व्या षटकाच्या आत चार बाद 124 अशी बिकट झाली होती.यावेळी कर्णधार पंतने शार्दूल ठाकूर ऐवजी अक्षर पटेलला बढती देत पाठवले पण अक्षर क्षणभरही टिकला नाही,आणि फक्त 1 धाव काढून चहलच्या गोलंदाजीवर त्रिफळाबाद झाला,यानंतर दिल्ली संघापासून विजय आणखीनच दूर दूर होत गेला,चेंडु ,बाकी गडी कमी आणि धावा जास्त यामुळे येणारे दडपण वाढत गेले,नाही म्हणायला ललित यादवने थोडीफार आक्रमकता दाखवली आणि फटकेबाजी करत 24 चेंडूत 37 धावा काढल्या.

अखेरच्या षटकात 36 धावा हव्या असताना पॉवेलने पहिल्या तीन चेंडवर तीन षटकात मारून सनसनाटी निर्माण केली खरी,पण त्याने फक्त पराभवातले अंतर कमी झाले इतकेच.अखेर दिल्ली संघाला विजयासाठी एक दोन नव्हे तर तब्बल 15 धावा कमी पडल्या आणि राजस्थान संघाने आणखी एक विजय मिळवून आपले विजयी अभिमान शानदाररित्या चालू ठेवत प्ले ऑफ साठी मजबूत दावेदारीही पेश केली आहे.तर या पराभवाने दिल्ली संघाला आणखी एका पराभवाला सामोरे जावे लागले आहे.

संक्षिप्त धावफलक

राजस्थान रॉयल्स

2 बाद 222

बटलर 116,पडीकल 54,संजू नाबाद 45

खलील 47/1,मुस्तफिजूर 43/1

विजयी विरुध्द

दिल्ली कॅपिटल्स

8 बाद 207

वॉर्नर 28,पृथ्वी 37,ऋषभ 44 ,ललित 36,पॉवेल 36

अश्विन 32/2,कृष्णा 22/3

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.