Pimpri News : पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटीसाठी केंद्र सरकारकडून 49 कोटीचा निधी प्राप्त

एमपीसी न्यूज – केंद्र शासनाकडून स्मार्ट सिटी अंतर्गत येणा-या विविध विकासकामे, प्रशासकीय व कार्यालयीन खर्चाकरिता तिसरा हप्ता 49 कोटी इतका प्रकल्प निधी प्राप्त झाला आहे.

गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालय, सरकारच्या वतीने आयोजित स्मार्ट सिटी चॅलेंजच्या तिस-या फेरीमध्ये भारत सरकारने स्मार्ट सिटी मिशन (एससीएम) अंतर्गत पिंपरी- चिंचवड स्मार्ट सिटी स्मार्ट प्रपोजल (एससीपी) ची निवड करून 13 जुलै 2017 रोजी पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेडची स्थापना करण्यात आली.

स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी केंद्र शासनाकडून तीन वर्षाच्या कालावधीसाठी 1 हजार कोटी रुपये निधीचा विकास आराखडा मंजूर झाला आहे. त्यापैकी पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटीला आतापर्यंत 587.84 कोटी निधी मिळाला आहे. केंद्र शासन 50 टक्के, राज्य शासन 25 टक्के आणि पिंपरी चिंचवड महापालिका 25 टक्के असा एकूण निधी स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत येणा-या विविध विकासकामांकरीता उपलब्ध् केला जातो.

त्याअनुषंगाने स्मार्ट सिटी अंतर्गत सूरू असलेल्या विकासकामांसाठी केंद्र शासनाकडे निधीची मागणी करण्यात आली होती. केंद्र शासनाकडून तिस-या टप्प्यातील 46.50 कोटी प्रकल्पनिधी तर प्रशासकीय व कार्यालयीन खर्चाकरिता 2.50  कोटी रुपये असे एकूण 49 कोटी रुपये निधी प्राप्त झाला आहे. त्याचबरोबर राज्य शासनाकडून त्यांच्या हिश्याची 24.50 कोटी पुणे जिल्हाधिकारी यांच्याकडे वर्ग करण्यात आली. सदरचा निधी जिल्हाधिकारी पुणे कोषागारातून आहरित करून पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटीकडे वर्ग केला जाणार आहे. तसेच, महापालिकेचा स्वहिस्सा 24.50 कोटी वर्ग करण्याची कार्यवाही सुरु असून आठवडाभराच्या कालावधीत हा निधी स्मार्ट सिटीसाठी उपलब्ध होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.