Pune News : रिक्षाचे भाडे वाढले; या रिक्षांना लागू असेल नवीन भाडे दर

एमपीसी न्यूज – प्रादेशिक परिवहन प्राधिकरण पुणे (पुणे, पिंपरी-चिंचवड व बारामती) यांची 11 नोव्हेंबर रोजी संयुक्त बैठक झाली. या बैठकीत रिक्षांचे भाडेदर वाढविण्याबाबत निर्णय घेण्यात आले आहेत. पहिल्या दीड किलोमीटरसाठी पूर्वी 18 रुपये भाडे होते. त्यात तीन रुपयांनी वाढ करू हे भाडे 21 रुपये करण्यात आले आहे. मात्र जे रिक्षा चालक मीटर पुनः प्रमाणीकरण करून घेतील त्याच रिक्षांना हे नवीन भाडेदर लागू होणार आहे. रिक्षा मीटरचे पुनः प्रमाणीकरण करून न घेतल्यास रिक्षा चालकांना कारवाईला देखील सामोरे जावे लागणार आहे. ही भाडेवाढ 22 नोव्हेंबर पासून लागू होणार आहे.

प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. अजित शिंदे यांनी याबाबत माहिती दिली. पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्राकरिता रात्री 12 ते सकाळी 5 या कालावधीसाठी 25 टक्के अतिरिक्त भाडेदर द्यावा लागणार आहे. तर महानगरपालिका क्षेत्र वगळून इतर ग्रामीण भागाकरिता रात्री 12 ते सकाळी 5 या कालावधीसाठी 40 टक्के अतिरिक्त भाडेदर द्यावा लागेल.

प्रवाशांसोबत असणाऱ्या सामानासाठी 60 X 40 सेंटीमीटर आकाराच्या किंवा त्यापेक्षा मोठ्या नगासाठी प्रति नग तीन रुपये लागतील. ही भाडेदरसुधारणा 22 नोव्हेंबर पासून लागू होणार असल्याने ऑटोरिक्षांचे मीटर पुनः प्रमाणीकरण (Meter Calibration) करण्यासाठी 22 नोव्हेंबर 2021 पासून 31 जानेवारी 2022 पर्यंत मुदत देण्यात आली आहे.

22 नोव्हेंबर पासून ऑटोरिक्षांकरिता सुधारित भाडेदर लागू होत असल्याने, जे ऑटोरिक्षा धारक 22 नोव्हेंबर पासून मीटर पुनः प्रमाणीकरण (Meter Calibration) करून घेतील त्याच ऑटोरिक्षा धारकांकरिता भाडेसुधारणा लागू राहील. जे ऑटोरिक्षाधारक विहित मुदतीत मीटर पुनःप्रमाणीकरण करून घेणार नाहीत त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे.

मीटर पुनःप्रमाणीकरण करून न घेतल्यास रिक्षा चालकांचा एक ते 40 दिवसापर्यंत परवाना निलंबित होऊ शकतो. तसेच 50 रुपयांपासून दोन हजार रुपयांपर्यंत आर्थिक दंडही होऊ शकतो.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.