Pimpri News : प्रभागांच्या कच्च्या आराखड्यात हेराफेरी; पालकमंत्र्यांच्या दबावाखाली भाजपाला आडवा आणि जिरवाची आयुक्तांची भूमिका

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांच्यावर पालकमंत्री अजित पवार यांचा प्रचंड दबाव आहे. भाजपला श्रेय मिळणारी कामे अडविली जातात. भाजपाला आडवा आणि जिरवाची आयुक्तांची भूमिका आहे. मालक असल्यासारखा त्यांचा कारभार असून त्यांना ‘मी-पणा’ आहे. महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग रचनेचा कच्चा प्रारुप आराखडाही दबावाखाली राष्ट्रवादीला अनुकूल केला. आयुक्तांच्या हुकुमशाहीविरोधात भाजप मोर्चा काढणार असल्याचा इशारा महापौर उषा ढोरे, सभागृह नेते नामदेव ढाके यांनी आज (बुधवार) पत्रकार परिषदेत दिला. यावेळी उपमहापौर हिरानानी घुले उपस्थित होत्या.

महापौर ढोरे म्हणाल्या, कोरोना काळातही गोरगरिबांना तीन हजार रुपये देण्याच्या विषयाला आयुक्तांनी फाटे फोडले. शहरातील महिलांना मोटार ड्रायव्हिंग प्रशिक्षण देण्याचा प्रस्ताव आहे. आयुक्तांनी तोही तसाच ठेवला. त्यालाही फाटे फोडले. आडकाठी आणत आहेत. कुरघोडी, मनमानी करतात. आयुक्त शहराचे मालक आहेत का? त्यांना मालक व्हायचे असेल तर निवडणूक लढवावी. आयुक्त आडवा आणि जिरवा करत आहेत. ते राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आहेत की सनदी अधिकारी आहेत?, त्यांचा मी निषेध करते.

सभागृह नेते नामदेव ढाके म्हणाले, गोरगरिबांना तीन हजार रुपये देण्याचा विषय, टॅब खरेदी आणि महिलांना मोटार ड्रायव्हिंग प्रशिक्षण देण्याचा विषय असो आयुक्त लोकोपयोगी योजनांना अडवितात. आयुक्तांनी भाजपची सुपारी घेतली आहे. राष्ट्रवादी, पालकमंत्र्यांच्या दबावाखाली आयुक्त काम करतात. निवडणुकीसाठीच्या प्रभाग रचनेचे कच्चा आराखड्याचे कामही दबावाखाली केले. भाजपला बदनाम करण्याचे षडयंत्र आयुक्तांनी रचले आहे. त्यांना मी पणा आहे. मी म्हणेन तेच फायनल अशी त्यांची भूमिका आहे. प्रशासनाने आणलेल्या विषयाला आम्ही मान्यता देतो. पण, प्रशासन आमचे विषय अडविते. आयुक्तांनी कामकाजात सुधारणा करावी. आम्ही त्यांना इशारा देत आहोत. अन्यथा आयुक्तांविरोधात मोर्चा काढण्यात येईल. दरम्यान, याबाबत आयुक्त राजेश पाटील यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्ना केला. पण, तो होऊ शकला नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.