River Plogathon : प्लास्टिकमुळे नदीरुपी मातेचे अतोनात नुकसान – आयुक्त राजेश पाटील

मोशी घाट परिसरात ‘रिव्हर प्लॉगेथॉन’

एमपीसी न्यूज – आपण भारतीय नदीला माता मानतो, पण आज प्लास्टिकमुळे (River Plogathon) आपल्या नदीरुपी मातेच अतोनात नुकसान होत आहे, त्यामुळे नागरिकांनी एकेरी वापरासाठी असलेल्या प्लास्टिकचा वापर बंद करून दैनंदिन जीवनात प्लास्टिकचा वापर कमी करावे, असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांनी केले.

जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून महापालिकेच्या वतीने शहरात 25 मे ते 5 जून 2022 या कालावधीत ‘प्लास्टिक मुक्त पिंपरी-चिंचवड शहर’ ही मोहिम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत आज (शनिवारी) इंद्रायणी नदीमध्ये मोशी घाट परिसरात ‘रिव्हर प्लॉगेथॉन’ मोहिम राबविण्यात आली. या मोहिमेत आयुक्त पाटील यांनी सहभाग घेऊन सहभागी नागरिक व कर्मचारी यांना संबोधित केले. यावेळी स्वच्छ सर्वेक्षण मुख्य समन्वयक अधिकारी रविकिरण घोडके, सहाय्यक आयुक्त राजेश आगळे, प्रशासन अधिकारी नाना मोरे, महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी यांच्यासह अविरत श्रमदान, भूगोल फाउंडेशन, इंद्रायणी सेवा संघ, बेसिक्स संस्था यांचे स्वयंसेवक, महाराष्ट्र सुरक्षा बलाचे कर्मचारी, नागरिक आदी उपस्थित होते.

Breaking News Corona : राज्यात सार्वजनिक ठिकाणी पुन्हा मास्क सक्ती

आयुक्त पाटील म्हणाले, की शहराला प्लास्टिक मुक्त करण्यासाठी महापालिकेच्या वतीने नागरिकांमध्ये, घरोघरी जाऊन जनजागृती करण्यात येत आहे. प्लास्टिकचा वापर टाळण्यासाठी गृहनिर्माण संस्थाना प्रोत्साहन देण्यासाठी सामान्य करामध्ये सवलत देण्यात येत आहे. जे लोक बंदी असलेले प्लास्टिक सर्रास वापरतात, त्यांच्यावर ग्रीन मार्शल पथकाच्या माध्यमातून दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. आता या दंडाच्या रकमेत वाढ करण्यात आली आहे. नद्या व समुद्रांमधील परिसंस्थांचे संवर्धन करण्यासाठी आणि पर्यावरणाचे समतोल राखण्यासाठी सर्व नागरिकांनी स्वत:हून प्लास्टिक मुक्त शहर (River Plogathon) मोहिमेत सहभाग घेतल्यास येत्या काही महिन्यांत आपले शहर प्लास्टिकमुक्त होईल, असा विश्वास आयुक्त पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.

आज सकाळपासून शहरातून वाहणाऱ्या इंद्रायणी, पवना आणि मुळा नद्यांमध्ये विविध ठिकाणी ‘रिव्हर प्लॉगेथॉन’ मोहीम राबविण्यात आली. ‘क’ क्षेत्रीय कार्यालायांतर्गत भैरवनाथ मंदिर मोई फाटा, रिव्हर रेसिडेन्सी इंद्रायणी लगतचा परिसर, ‘ड’ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत म्हातोबा घाट परिसर, चौन्धे लॉन्स परिसर विशाल नगर पिंपळे निलख येथे, ‘ई’ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत मोशी घाट परिसर, डूडूळगाव घाट, बोपखेल घाट येथे, ‘फ’ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत चिखली येथील स्मशानभूमी शेजारील मोकळ्या जागेत, ‘ग’ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत केजुदेवी घाट परिसरात, ‘ह’  क्षेत्रीय कार्यालयात पवना नदी किनारा, सांगवी स्मशानभूमी घाट परिसर, मुळा नदी घाट परिसर, दापोडी स्मशानभूमी घाट परिसर, याठिकाणी ‘रिव्हर प्लॉगेथॉन’ (River Plogathon) मोहीम राबविण्यात आली.

यावेळी संबंधित क्षेत्रीय कार्यालयांचे क्षेत्रीय अधिकारी यांच्या उपस्थितीत ही मोहीम पार पडली. यावेळी महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी, विविध अशासकीय संस्थेचे स्वयंसेवक, विद्यार्थी, नागरिक आदी उपस्थित होते. या मोहिमेत नद्यांमध्ये असलेले प्लास्टिक संकलित करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी स्वच्छतेची आणि प्लास्टिक मुक्तीची शपथ घेतली. त्यानंतर बेसिक्स संस्थेच्या वतीने प्लास्टिक मुक्ती आणि स्वच्छतेसंबंधी पथनाट्य सादर करण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.