Eknath Pawar : राष्ट्रवादीने जनतेला चोवीस तास पाण्याचे स्वप्न दाखवून फसविले

एमपीसी न्यूज : पिंपरी चिंचवडकरांना राष्ट्रवादी काॅंग्रेसने चोवीस बाय सात तास पाणी देण्याचे स्वप्न दाखवून पंधरा वर्ष सत्ता भोगली; पण त्यांनी नागरिकांना कधीही चोवीस तास पाणी दिले नाही. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी चिंचवडमधील राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या मेळाव्यात भाजपवर केलेल्या टिकेला एकनाथ पवार (Eknath Pawar) यांनी प्रतिउत्तर दिले आहे. 

 

एकनाथ पवार पुढे म्हणाले की,  सध्यस्थितीत महानगरपालिकेच्या प्रशासकांआडून शहरात कृत्रिम पाणी टंचाई दाखवून त्यांचे खापर विरोधक भाजपवर फोडत आहेत. मूळात भाजपने पाच वर्षात आंद्राचे पाणी आणून पाणी प्रश्न सोडविला आहे. तर, भामा-आसखेडचे पाणी आल्यास शहराचा संपुर्ण पाणी प्रश्न मिटणार आहे. परंतु, आता महानगरपालिका निवडणुका डोळ्यासमोर दिसू लागल्याने पालकमंत्र्यांना पिंपरी-चिंचवडचे प्रश्न दिसू लागले आहेत. त्यांनी नागरिकांना दररोज पाणी देण्याचे आश्वासन दिलंय खऱं, पण त्या बदल्यात मला शंभर नगरसेवक निवडून देण्याचा दमवजा इशाराही दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून खोटी आश्वासनं देवून नागरिकांना दिलेल्या दमदाटी पिंपरी-चिंचवडची जनता कदापि भूलणार नाही, अशी टीका भाजपचे प्रदेश प्रवक्ते एकनाथ पवार (Eknath Pawar) यांनी केली.

भारतीय जनता पार्टी पहिल्यांदाच महापालिकेवर सत्तेवर आली होती. गेल्या पाच वर्षात पिंपरी-चिंचवड शहरात मोठ्या प्रमाणात विकास कामे केली. विशेषता: राष्ट्रवादीच्या सत्तेत 20 वर्ष विकासापासून दूर असलेल्या समाविष्ट गावातील मूलभूत प्रश्न सोडविण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. त्याचबरोबर शहरात परदेशातील धर्तीवर शहरात विविध उद्याने विकसित केली. शहरातील प्रमुख रस्ते सिमेंट कॉक्रींट करण्यात येत आहेत. शहरातील फूटपाथ, सायकल ट्रॅक, ज्येष्ठांना फूटपाथवर बसण्याची बैठक व्यवस्था तयार केली आहे.
नव्याने शहरातील ड्रेनेज लाईन बदलण्यात येत आहे. शहर स्वच्छ व सुंदर करण्यासाठी शहरातील प्रमुख चौकाचे सुशोभिकरण करण्यात आले आहे. संपुर्ण शहर कचराकुंडी मुक्त करुन कचरा समस्या सोडविली आहे. तसेच, स्मार्ट सिटी अंतर्गत शहर भयमुक्त व सुरक्षित राहण्यासाठी सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करत प्रमुख चौकाचौकात सीसीटीव्ही बसविले आहेत. स्मार्ट व्हिलेजनुसार शॉपिंग मॉल तयार करण्यात येत आहे. देशात सर्वाधिक प्रदुषित असणाऱ्या पवना व इंद्रायणीचा नदी सुधार प्रकल्प आराखडा तयार करुन त्यांचे काम हाती घेतले आहे. अशा प्रकारे विविध विकास कामे भाजपने करुन शहरात विकास कामाची गंगा आणली आहे.

मात्र, गेल्या पंधरा वर्षात राष्ट्रवादी काॅंग्रेसला जेवढी विकास कामे करता आली नाहीत. त्यापेक्षा कितीतरी पटीने भाजपने शहरात विकास कामे केलेली आहेत. त्याच विकास कामांची भूमिपूजने आणि उद्घाटने राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार हे करत आहेत.
तसेच, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पिंपरी-चिंचवड शहराचा पाणी प्रश्न सोडवता आलेला नाही. महापालिकेची पंधरा वर्ष सत्ता एकहाती असताना पवना धरणातून थेट बंदिस्त पाईपलाईनचा प्रश्न सोडवला नाही. उलट शेतकरी आंदोलकांवर गोळीबार करुन त्यांचा जीव घेतला. त्या शेतकऱ्याचा रक्ताचा पाट वाहिली, पण पिंपरी-चिंचवडच्या नागरिकांना पाणी देता आले नाही. त्यातील जखमी लोकांच्या काही नातेवाईकांना अजूनही महापालिकेची नोकरी देखील दिलेली नाही.
पवना बंदिस्त जलवाहिनीचा प्रकल्प गुंडाळून ठेवला, पण करदात्या नागरिकांचे सुमारे 200 कोटी रुपये पाण्यात गेले. त्याला जबाबदार कोण आहे? त्यामुळे पिंपरी-चिंचवडच्या जनतेला धमकीवजा इशारा देऊन तुम्ही मला शंभर नगरसेवक द्या, मगच तुमचा पाणी प्रश्न सोडवण्याची भाषा करता, हि कुठल्या विकास कामाची पद्धत आहे? असा सवाल एकनाथ पवार यांनी उपस्थितीत केला आहे.
दरम्यान, भाजपच्या पाच वर्षांच्या कारर्किद आंद्रा योजनेचे 100 एमएलडी पाणी हे पंधरा दिवसात मोशी, डुडूळगांव, च-होली, चिखली आणि भोसरीच्या काही भागात सुरु होणार आहे. त्यामुळे तेथील नागरिकांना उच्च दाबाने व सुरळीत पाणी पुरवठा सुरु होईल. त्या भागातील पुर्वीचे अतिरिक्त पाणी हे अन्य भागात वळविण्यात येणार आहे. शिवाय, भामा-आखखेड योजनेचे 167 एमएलडी पाणी देखील लवकरच शहराला मिळेल. त्यामुळे पवना धरणाचे 480 आणि आंद्राचे 100, भामा-आसखेडचे 167 असे एकूण 747 एमएलडी पाणी मिळेल. त्यामुळे संपुर्ण शहराचा पाणी प्रश्न मिटणार आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील जनता थापा मारणाऱ्या पालकमंत्र्याला कधीही भूलणार नाही, असे एकनाथ पवार म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.