Satara News : राज्यपालांनी पदाची मर्यादा ठेवून वक्तव्य करायला हवे ; वक्तव्य मागे घेण्याची छत्रपती उदयनराजे भोसले यांची मागणी

एमपीसी न्यूज – महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत औरंगाबाद येथे वादग्रस्त वक्तव्य केले आहे. राज्यपालांच्या या वक्तव्याचा राज्यभरातून निषेध केला जात आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे 13 वे वंशज आणि साताराचे भाजप खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी राज्यपालांचे वक्तव्य चुकीचे असल्याचे म्हटले आहे. राज्यपालांनी पदाची मर्यादा ठेवून वक्तव्य करायला हवे होते, व त्वरित वक्तव्य मागे घ्यावे अशी मागणी त्यांनी केली आहे.

खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी एक फेब्रुवारी पोस्ट शेअर करत राज्यपालांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. ‘राष्ट्रमाता जिजाऊ या छत्रपती शिवाजी महाराजांच्या खऱ्या गुरू होत्या तर रामदास हे कधीही गुरु नव्हते. हा खरा इतिहास आहे. तरीही औरंगाबाद येथील एका कार्यक्रमात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास यांचा संदर्भ देवून चुकिचा इतिहास सांगितला आहे. त्यामुळे शिवप्रेमींमध्ये संतप्त प्रतिक्रिया येत आहेत.’

‘खरं तर राज्यपालांनी आपल्या पदाची मर्यादा ठेवून वक्तव्य करायला हवे होते. त्यांच्या वक्तव्यामुळे शिवप्रेमींसह संपूर्ण महाराष्ट्राच्या भावना दुखावल्या आहेत. तरी राज्यपाल कोश्यारी यांनी आपले वक्तव्य त्वरित मागे घ्यावे.’ असं उदयनराजे यांनी म्हटले आहे.

काय म्हणाले होते राज्यपाल

औरंगाबाद येथील कार्यक्रमात राज्यपाल कोश्यारी म्हणाले की, ‘महाराजा, चक्रवर्ती सगळे झाले. चाणक्याशिवाय चंद्रगुप्ताला कोण विचारेल, समर्थांशिवाय शिवाजीला कोण विचारेल? मी शिवाजी किंवा चंद्रगुप्त यांना छोटं दाखवत नाही. प्रत्येकाच्या मागे आईचं मोठं योगदान असतं, तसंच आपल्या समाजात गुरूचं मोठं स्थान असतं. शिवाजी महाराजांनी समर्थांना म्हटलं की तुमच्या कृपेने मला राज्य मिळालं आहे.’

‘या देशाची परंपरा आहे की, गुरू आहे तर त्याला गुरुदक्षिणा द्यावी लागते. मी जिंकलोय, राज्याची स्थापना देखील झाली आणि मी रायगडावर आलो आहे. आता गुरुदक्षिणा म्हणून या राज्याची चावी तुम्हाला देतो, असं शिवाजी महाराज समर्थांना म्हटले, पण समर्थांनी ती चावी घेतली नाही. समर्थांनी शिवाजी महाराजांना ते या राज्याचे विश्वस्त असल्याचं सांगितलं.’ असं वक्तव्य राज्यपाल कोश्यारी यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.