Sharad Pawar and BJP Maharashtra : शरद पवार म्हणतात, राज्यात भाजपचे सरकार येऊ देणार नाही… त्यावर भाजपचे प्रतिउत्तर, ‘पवार साहेब…..

एमपीसी न्यूज – नुकत्याच पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका पार पडल्या. यामध्ये चार राज्यात भाजपला विजय मिळाला. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या युवा आमदारांनी शरद पवार यांची भेट घेतली आणि चर्चा केली. त्यावेळी युवा आमदारांशी चर्चा करताना शरद पवार म्हणाले की, ‘घाबरण्याचं कारण नाही. आम्ही राज्यात भाजपचं सरकार येऊ देणार नाही.’ पवार यांच्या या विधानावरून भाजपने देखील जोरदार प्रतिउत्तर दिले आहे.

‘आदरणीय साहेब, भाजपची काळजी करू नका! स्वतःच्या पक्षाचे 60 च्या वर आमदार निवडून आणा. इतर प्रादेशिक पक्षांनी 10 वर्षात दोन राज्यात सत्ता स्थापन केली आहे, तुम्ही अजून साडे तीन जिल्ह्यातच अडकलात. 55 वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत स्वतःच्या पक्षाचा मुख्यमंत्री बनवून दाखवा’ असे ट्विट महाराष्ट्र भाजपच्या अधिकृत ट्विट अकाउंटवरून करण्यात आले आहे.

आणखी एक ट्विट करत भाजपने म्हटले आहे की, ‘आदरणीय शरद पवारजी, भाजपला येऊ न देण्याच्या गोष्टी नंतर करा. आधी हे प्रश्न सोडून दाखवा. राज्यात एसटी बंद, 6 महिन्यापासून कर्मचारी संपावर आहेत. राज्यात शेतकऱ्यांची वीज तोडली जात आहे, पिकं उभं उभं करपून जात आहेत. मराठा, OBC आरक्षणाचा प्रश्न सोडून दाखवा.’ असे म्हटले आहे.

महाराष्ट्र भाजपने तिसरे ट्विट करून म्हटले आहे की, ‘आदरणीय शरद पवारजी, कोण येणार? कोण नाही हे सर्व महाराष्ट्रातील जनता ठरवते. लोकशाहीत जनता सर्वश्रेष्ठ असते, तुम्ही नाही. जनतेने भाजपला 105 जागा दिल्या. तुम्ही पावसात भिजूनही त्याच्या अर्धे आमदारही निवडून आणू शकला नाहीत. जनमताचा अनादर करणाऱ्यांना जनता योग्य वेळी धडा शिकवेल!’

शरद पवार काय म्हणाले –

नुकत्याच पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका पार पडल्या. यात पाचपैकी चार राज्यांत भाजपला एकहाती सत्ता मिळाली. तर पंजाबमध्ये आम आदमी पक्षाने निवडणूक जिंकली. या निवडणुकांच्या निकालांबाबत गुरुवारी (दि. 17) युवा आमदारांनी शरद पवार यांच्यासमोर आपापले प्रश्न मांडले. बैठक संपल्यानंतर सर्व आमदार जाण्यासाठी निघाले. त्यावेळी शरद पवार उभे राहिले, त्यांनी दोन्ही हात उंचावले आणि आपल्या हाताची मुठ बंद करुन म्हणाले की, “घाबरण्याची गरज नाही. आम्ही राज्यात भाजपचं सरकार येऊ देणार नाही.”

पुढे बोलताना पवार म्हणाले की, “भाजप जरी आपला राजकीय प्रतिस्पर्धी असला, तरी भाजपमधील काही नेत्यांकडून शिकण्यासारखं बरच काही आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, दिवसाला 24 तास काम करण्याचीही तयारी, योजनांची आखणी आणि निवडणुकांसाठी आखण्यात आलेली रणनिती यांसारखे अनेक गुण आहेत. जे भाजप नेत्यांकडून शिकण्याची गरज आहे.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.