Pune News : शिवसेनेने हिंदूजननायक पदवी चोरली, मनसेची शिवसेनेवर बोचरी टीका

एमपीसी न्यूज – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात राज्यातील मशिदींवरील भोंगे हटवण्याची मागणी राज्य सरकारकडे केली होती, असे करताना त्यांनी आपसुकच हिंदुत्वाचा मुद्दा उचलला होता. यानंतर राज ठाकरे यांना मनसैनिकांकडून हिंदू जननायक ही पदवी देण्यात आली. त्यानंतर औरंगाबाद येथे झालेल्या सभेत, पुण्यात मुंबईत आणि इतरही शहरात राज ठाकरे हे हिंदू जननायक असल्याचे बॅनर लागले होते. हे बॅनर पाहून दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांची आठवण येत असल्याचे ही अनेकांनी सांगितले होते.

परंतु, आता मात्र मुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नावासमोर देखील हिंदू जननायक ही पदवी लावण्यात आली आहे. शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी त्यांच्या फेसबुकवर आज एक पोस्टर टाकले आहे. यामध्ये उद्धव ठाकरे यांचा उल्लेख हिंदू जननायक असा करण्यात आला आहे. यावरुनच आता मनसेने पुन्हा एकदा शिवसेनेवर बोचरी टीका केली आहे.

मनसेचे पुणे शहरातील प्रवक्ते योगेश खैरे यांनी आपल्या ट्विटरवरून शिवसेनेवर निशाणा साधला आहे. राजसाहेब आयोध्येला निघाले की यांचा दौरा जाहीर, राज साहेबांनी सभा घेतली की हे पण सभा करणार, हे मनसेचे नगरसेवक चोरणार, हे मनसेच्या सभेच्या गर्दी चे फोटो चोरणार.. आता तर कहर… हिंदू जननायक ही पदवी पण चोरत आहेत… स्वतःचं काहीतरी असली करणार का नाही? असा प्रश्न देखील त्यांनी या माध्यमातून विचारला आहे. त्यामुळे शिवसेना आता या टीकेला कशा प्रकारे प्रत्युत्तर देते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.