Pune Crime News : पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या प्रयत्नात असलेली दरोडेखोरांची टोळी जेरबंद

एमपीसी न्यूज – पुणे जिल्ह्यातील आळेफाटा या ठिकाणी असलेल्या एका पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या एका सराईत गुन्हेगारांच्या टोळीला पोलिसांनी जेरबंद केले आहे. यामध्ये मोक्काच्या गुन्ह्यात फरार असलेला आरोपी अंकुश खंडू पवार याच्यासह चौघांना अटक करण्यात आली आहे, तर इतर तीन जण पळून गेले आहेत. जुन्नर तालुक्यातील आणि परिसरात ही कारवाई करण्यात आली.

नवनाथ राजू पवार, अनिकेत बबन पवार, अंकुश खंडू पवार आणि प्रवीण दत्तात्रय आंबेकर अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर इतर तीन आरोपी पळून गेली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आळेफाटा परिसरात संशयित वाहनांची ग्रामीण पोलिसांकडून तपासणी सुरू होती. यावेळी सोमवारी पहाटेच्या सुमारास भरधाव वेगातील ओमिनी गाडी पोलिसांना न जुमानता निघून गेली. पोलिसांना या गाडीचा संशय आल्याने त्यांनी तिचा पाठलाग सुरू केला. दरम्यान पोलीस आपल्या मागावर असल्याचे लक्षात आल्यानंतर आरोपींनी रस्त्याच्या कडेला गाडी लावून एका उसाच्या शेतात आश्रय घेतला. पोलिसांनी शोध मोहीम राबवत चार आरोपींना ताब्यात घेतले तर तीन जण पळून गेले आहेत. त्यांच्याकडे केलेल्या अधिक चौकशीत आळेफाटा येथील एका पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या हिशोबाने आल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान अटक करण्यात आलेले आरोपी हे सराईत गुन्हेगार आहेत. त्यांनी पुणे ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत 5 तर अहमदनगर पोलिसांच्या हद्दीत तीन गुन्हे केल्याची कबुली दिली. आरोपींकडून आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.