Ashadhi Wari 2022 : आषाढी वारीसाठी एसटीची जोरदार तयारी, पुणे विभागातून पंढरपूरसाठी 530 बस

एमपीसी न्यूज – कोरोनामुळे मागील दोन वर्षापासून होऊ न शकलेली पंढरपूरची वारी (Ashadhi Wari 2022) यंदा मात्र मोठ्या थाटात होणार आहे. अंदाजे पंधरा लाख लोक इंद्राच्या वारीत सहभागी होतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांसाठी एसटीच्या पुणे विभागाने जोरदार तयारी केली आहे. वाढत्या भाविकांचा आकडा विचारात घेऊन 530 गाड्या पंढरपूरसाठी सोडण्यात येणार आहेत.

आषाढी वारीच्या (Ashadhi Wari 2022) दिवशी पुणे जिल्ह्यातून पंढरपूर येथे जाणाऱ्या भाविकांची संख्या मोठी असते. त्यात यावर्षी दोन वर्षानंतर आषाढी वारी सोहळा होणार असल्याने अधिक गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे एसटी प्रशासनाने यासाठी जोरदार तयारी केली असून या वर्षी जास्त गाड्या सोडण्याचे नियोजन केले आहे.

PM Modi Dehu Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या देहू येथील सभेसाठी पीएमपी कडून 20 ई-बस

यंदा एसटीच्या पुणे विभागातून पंढरपूर साठी 530 गाड्या सोडण्यात येणार आहेत. त्यामुळे यंदा पंढरपूरला एसटीने जाणाऱ्या वारकऱ्यांना एसटीची कमतरता जाणवणार नाही. मागील चार वर्षांची तुलना करता या वर्षी सर्वाधिक गाड्या सोडण्यात आल्याचे एसटी प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

एखाद्या गावातून 40 जण पंढरपूरला जाणार असतील तर थेट त्यांच्या गावातूनच एसटी सोडण्याची व्यवस्था ही करण्यात आली आहे. एकत्र बुकींग केल्यास त्यांच्या गावात जाऊन एसटी प्रवाशांना पंढरपूर येथे सोेडेल आणि त्यानंतर पुन्हा त्यांच्या गावी सोडेल. त्यामुळे प्रवाशांना थेट घरापासून पंढरपूरला जाण्याची व्यवस्था एसटी विभागाकडून या वर्षी करण्यात आली आहे. नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन एसटी प्रशासनाने केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.