Pune News : सासरच्या जाचाला कंटाळून जावयाची आत्महत्या, चिठ्ठीत लिहून ठेवले कारण

एमपीसी न्यूज : पुण्यात चतु:र्श्रुंगी पोलिस स्टेशनच्या हद्दीत एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. या तरुणाने आत्महत्या करण्यापूर्वी एक चिठ्ठी लिहून ठेवली असून त्यामध्ये सासरच्या त्रासाला कंटाळून आणि कर्जबाजारी झाल्यामुळे आत्महत्या करत असल्याचे लिहून ठेवले आहे. निखिल धोत्रे (वय 29) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. चतु:शृंगी पोलीस ठाण्यात या प्रकरणी आकस्मिक मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, निखील धोत्रे याचे एक वर्षापूर्वी सोनाली नामक तरुणीसोबत लग्न झाले होते. सध्या ती नऊ महिन्यांची गर्भवती आहे. दोन दिवसांपूर्वी तिने पतीने मारहाण केल्याचा आणि दिराने हार्पिक पाजण्याचा आरोप केला होता. सध्या तिच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहे. तर याप्रकरणी पती, दिरासह तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दरम्यान रविवारी निखिल घरात एकटाच होता. सायंकाळच्या सुमारास त्याने बायकोच्या ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी लिहून ठेवलेली एक चिठ्ठी सापडली असून त्यामध्ये. ‘आपल्याला सासरच्या लोकांनी खूप त्रास दिला आहे. त्यांच्यामुळे आपण कर्जबाजारी झालो आहे. माझ्या मृत्युला तेच जबाबदार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पालकमंत्री अजित पवार यांनी त्यांच्यावर कठोर कारवाई करावी असे म्हणून त्यात सासरकडच्या सर्वांची नावे लिहिली आहेत. त्याच चिठ्ठीत त्याने ‘आई तू काळजी करु नकोस, मी पुन्हा तुझ्या पोटी जन्म घेईन. आई मी समजून माझ्या बाळाला सांभाळ, त्याची काळजी घे’, असे लिहिले आहे. याप्रकरणी चतुःश्रुंगी पोलीस तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.