Pimpri News: दहावी – बारावीच्या विद्यार्थ्यांना न खेळताही मिळणार क्रीडा गुण !

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या लाटेमुळे लागोपाठ दुस-या वर्षी शालेय क्रीडा स्पर्धा होऊ शकल्या नाहीत. मात्र, त्यानंतरही दहावी आणि बारावीच्या खेळाडू विद्यार्थ्यांना वाढीव क्रीडा गुण दिले जाणार आहेत. या संदर्भातील आदेश राज्य सरकारच्या क्रीडा व युवक कल्याण विभागाने जारी केले आहेत. या निर्णयाचा लाभ राज्यातील शेकडो खेळाडूंना मिळणार आहे.

राज्य शासनातर्फे आयोजित शालेय स्पर्धांमध्ये सहभागी होणा-या दहावी आणि बारावीतील खेळाडू – विद्यार्थ्यांना दरवर्षी सवलतीचे क्रीडा गुण देण्यात येते. मात्र, कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांमध्ये एकही शालेय स्पर्धा झाली नाही. त्यामुळे खेळाडूंचे प्रचंड नुकसान झाले आहे. हे नुकसान टाळण्यासाठी राज्य शासनाने यंदाही खेळाडूंना वाढीव गुण देण्याचा निर्णय घेतला आहे. क्रीडा गुणांसाठी खेळाडूची सहावीनंतरची क्रीडा कामगिरी लक्षात घेतली जाणार आहे.

क्रीडा आणि युवक कल्याण विभागाचे आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी शिक्षण विभागाच्या अतिरिक्त आयुक्तांना प्रस्ताव पाठवून वाढीव क्रीडा गुणांसाठी जिल्हा, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये खेळलेल्या दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांची सहाव्या इयत्तेपासूनची कामगिरी विचारात घेण्याची विनंती केली होती. यासंदर्भात शारीरिक शिक्षण आणि क्रीडा शिक्षक महासंघानेही क्रीडा व युवक कल्याण विभागाला पत्र पाठवून क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी होण्याची अट शिथिल करण्याची विनंती केली होती. राज्य शासनाने त्यांच्या मागणीची दखल घेत खेळाडूंना सलग दुस-या वर्षी क्रीडा गुणांचा लाभ देण्याचा निर्णय घेतला आहे.

शासन निर्णयानुसार, राष्ट्रीय स्पर्धांमध्ये प्रथम तीन स्थानांवरील खेळाडूंना प्रत्येकी 25 गुण तर सहभागी खेळाडूंना 20 गुण देण्यात येते. तर राज्य स्पर्धेतील खेळाडूंना अनुक्रमे 20 व 15 गुण दिले जाते. याशिवाय जिल्हा स्पर्धेत सहभागी झालेल्यांना प्रत्येकी पाच गुण देण्यात येतात. संबंधित शाळा आणि महाविद्यालयांनी पात्र असलेल्या खेळाडूंचे प्रस्ताव लवकरात लवकर जिल्हा क्रीडा विभागात पाठवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

सविस्तर माहितीसाठी जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयात संपर्क साधता येईल. कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांत शालेय आणि इतर स्पर्धा होऊ शकल्या नाहीत. त्यामुळे खेळाडूंचे खूप नुकसान झाले. अशा खेळाडूंना राज्य शासनाने भूतकाळातील कामगिरीच्या आधारावर क्रीडा गुण देण्याचा घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे. त्यामुळे अनेक खेळाडूंना फायदा होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.