Pune News: भावनेची भाषा श्रेष्ठ; सुबोध मराठीचा वापर करा – लक्ष्मीकांत देशमुख

एमपीसी न्यूज – भावनेची भाषा श्रेष्ठ आहे. शब्दातून व्यक्त होणं व ऐकणाऱ्याला समजणे हे महत्त्वाचे आहे. भाषा हे भावना व्यक्त करण्याचे महत्त्वाचे साधन आहे. त्यामुळे सुबोध मराठीचा वापर करावा, असे प्रतिपादन 91 व्या मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष व प्रसिद्ध साहित्यिक लक्ष्मीकांत देशमुख यांनी केले.

पुणे येथील मातृभाषा अध्यापक संघाच्या वतीने मराठी राजभाषा दिना निमित्त शालेय विद्यार्थी व शिक्षकांसाठी निबंध लेखन व वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. सदर स्पर्धांना पुणे शहरातील विद्यार्थी व शिक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला.

या स्पर्धांचा पारितोषिक वितरण समारंभ नुकताच आप्पा बळवंत चौकाजवळील नूतन मराठी विद्यालय येथे संपन्न झाला. त्यावेळी समारंभाच्या अध्यक्षस्थानावरून देशमुख बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून संवाद संस्थेचे अध्यक्ष सुनील महाजन उपस्थित होते.

देशमुख म्हणाले की, उच्च शिक्षण मातृभाषेतून मिळाले पाहिजे. नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा त्यांनी पुरस्कार केला. ग्रामीण भागातून आलेल्या तरुणांनी भाषेविषयी कोणताही न्यूनगंड बाळगू नये. आपल्या बोलीभाषेविषयी आत्मविश्वास बाळगावा, असे महाजन यांनी सांगितले. पेशवे उद्यानात संघाच्या कामकाजासाठी जागा उपलब्ध करून देण्याचे महाजन यांनी यावेळी जाहीर केले.

एमपीसी न्यूज पाॅडकास्ट | पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरासह देशातील ठळक घडामोडींचा थोडक्यात आढावा | पाॅडकास्ट ऐकण्यासाठी ही लिंक क्लिक करा….

समारंभाच्या प्रारंभी आकांक्षा गडीकर हिने सरस्वती वंदना सादर केली.पारितोषिक वितरण समारंभाचे प्रास्ताविक संघाच्या अध्यक्षा स्मिता ओव्हाळ यांनी अहवालात संघाची उद्दिष्टे व कार्य यांची माहिती दिली. पाहुण्यांचा परिचय संघाच्या कोषाध्यक्ष निमल गीताभारती यांनी करून दिला.

संघाच्या उपाध्यक्षा हेमलता भूमकर यांच्या हस्ते पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. शिक्षणतज्ज्ञ व आपटे प्रशालेचे निवृत्त प्राचार्य डॉ. अ. ल. देशमुख यांनी संघाच्या कार्याचे कौतुक केले. संघाने लॉकडाऊन काळात विविध क्षेत्रातील साहित्यिक व मान्यवरांच्या 29 ऑनलाईन व्याख्यानांचे आयोजन केले होते. त्यातून विद्यार्थी, शिक्षक व पालक यांना मार्गदर्शन झाले, असे त्यांनी सांगितले.

एमपीसी न्यूज शिक्षण संवाद | काऊंटडाऊन दहावी | दहावीच्या भूमितीची तयारी करूयात दहा दिवसांत – मनोज उल्हे | अत्यंत उपयुक्त व्हिडिओ पाहण्यासाठी ही लिंक क्लिक करा…

दरम्यान, दयानंद घोटकर, सुरेखा सोनावणे, प्रसिध्द कवयित्री व लेखिका श्यामला पंडित (दीक्षित) यांनी परिक्षणाचे कार्य केल्याबद्दल अध्यक्षांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. निबंध लेखन स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त केलेल्या शिक्षिका प्रिया बांद्रे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. समृध्दी शिंदे हिने माझ्या आवडत्या लेखिका सुधा मूर्ती यांच्या विषयी भाषण केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संघाच्या उपसचिव वंदना आणेकर यांनी केले. कार्याध्यक्ष सुरेखा लेंबे यांनी आपल्या विद्यार्थीनींचा सहभाग घेत विशेष सजावट, पारितोषिक वितरण, रांगोळी, मांडणी यात उल्लेखनिय सहभाग घेतला, त्यांच्यामुळे कार्यक्रमास विशेष शोभा आली. विद्यार्थीनींचा उत्साह यावेळी वाखाणण्याजोगा होता.

इंद्रायणी महाविद्यालयाचे सेवानिवृत्त उप प्राचार्य सुनील ओव्हाळ यांनी या कार्यक्रमासाठी महत्वपूर्ण सहकार्य केले. शारदा पानगे यांनी उपस्थितांचे आभार मानले. नू.म.वि.शाळेच्या मुख्याध्यापिका गुमास्ते तसेच हनुमंत कुबडे श्री. गायके, श्री.जगताप, नंदकिशोर नगरकर यांचे सहकार्य लाभले.

कार्यक्रमास शहरातील स्पर्धेत सहभागी विद्यार्थी, शिक्षक व पालक उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.