Pimpri News : महाराष्ट्रातील सर्वात भव्य शिवजयंती महोत्सवाचे पिंपरीत आयोजन

जिजाऊंच्या लेकींच्या हस्ते होणार शिवस्मारकाचे अनावरण; शनिवारी आणि रविवारी ऐतिहासिक महानाट्य शिवसह्याद्रिचे आयोजन

एमपीसी न्यूज – अखिल पिंपरी शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने भव्य शिवजयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. शिवजयंतीनिमित्त फाल्गुन वद्य तृतीया सोमवारी (दि. 21 मार्च) पिंपरी गावातील भैरवनाथ मंदिर चौकात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

यामध्ये श्री शिवजन्मोत्सव सोहळ्यानिमित्त सकाळी 6 वाजता श्री शिवमुर्तीस दुग्धाभिषेक, 8 वाजता होमहवन व जन्मोत्सव पाळणा, मानकरी महिलांच्या उपस्थितीत दुपारी 4 वाजता शगुन चौक ते पिंपरी शिवस्मारकापर्यंत भव्य पालखी सोहळा, सायंकाळी 5.30 वाजता शिवराज्याभिषेकाच्या भव्यदिव्य सोहळ्याचे जिवंत सादरीकरण आणि सायंकाळी 6 वाजता जिजाऊंच्या लेकिंच्या हस्ते भव्य शिवस्मारकाचा अनावरण सोहळा पार पडणार आहे.

यावेळी मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके, पारंपारिक वाद्य, ढोल पथक आणि फटाक्यांची आतषबाजी, महाप्रसाद अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती अखिल पिंपरी शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने प्रसिध्दीस देण्यात आली आहे.

दरम्यान, शनिवारी आणि रविवारी (दि. 19 आणि 20 मार्च) सायंकाळी 6 वाजता नवमहाराष्ट्र विद्यालयाच्या क्रीडांगणात लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नाव नोंदविलेले दिग्दर्शक ॲड. विनय चंद्रकांत घोरपडे लिखित निर्मित आणि दिग्दर्शित ‘ऐतिहासिक महानाट्य शिवसह्याद्रि’ हे महानाट्य सर्वांसाठी मोफत आयोजित करण्यात आले आहे.

यामध्ये शनिवारी शिवपुर्वकाळ ते शिवराज्याभिषेक आणि रविवारी छत्रपती संभाजी महाराज ते औरंगजेब मृत्यू या सर्व प्रसंगांचे जिवंत व ज्वलंत इतिहासाचे उत्कृष्ट सादरीकरण करण्यात येणार आहे. चार मजली सरकता 100 फुटांचा रंगमंच, मर्दानी खेळ व चित्तथरारक लढाई, घोडे, उंट, बैलगाड्यांचा प्रत्यक्ष रंगमंचावर वावर, शिवकालीन ऐतहासिक वेषभुषेतील 500 कलाकारांचे सादरीकरण आणि नेत्रदिपक आतिषबाजीसह छत्रपतींचा राज्याभिषेक सोहळा या महानाट्याचे मुख्य आकर्षण असणार आहे.

हे महानाट्य सर्वांसाठी मोफत असून छत्रपतींचा जाज्वल्य, ज्वलंत इतिहास यामध्ये पहायला मिळणार आहे. त्यामुळे शहरातील सर्व शिवभक्तांनी उपस्थित राहावे, असे आवाहन अखिल पिंपरी शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.