Pune News : प्रवाशांना लुबाडणाऱ्या तोतया पोलिसाला लोहमार्ग पोलिसांनी पकडले

एमपीसी न्यूज : पोलीस असल्याचे भासवून रेल्वे प्रवाशांना लुबाडणाऱ्या तोतयाला लोहमार्ग पोलिसांनी अटक केली आहे. अविनाश भारत भुर्लेकर (वय 24, रा. शिंदखेरा, ता. हुमनाबाद, बिदर, कर्नाटक) असे या तोतयाचे नाव आहे. आरोपी हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे. त्याने अशा प्रकारे सिकंदराबाद, हैदराबाद, दादर आणि सीएसटी याठिकाणीही पोलीस असल्याचे सांगून प्रवाशांची फसवणूक केल्याची कबुली दिली आहे.  

याप्रकरणी अधिक माहिती अशी की संतोष पासवान हे सहा डिसेंबर रोजी रेल्वेचे आरक्षण करण्यासाठी पुणे स्टेशन वर आले होते. यावेळी आरोपीने पोलीस असल्याचे सांगून पासवान यांच्याकडून अकरा हजार रुपये घेतले आणि पळ काढला होता.

दरम्यान पासवान यांना लुबाडणारा आरोपी पुणे स्टेशन परिसरात येणार असल्याची माहिती लोहमार्ग पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार लोहमार्ग पोलिसांनी बुकिंग ऑफिस व प्लॅटफॉर्म या ठिकाणी सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. अशाच प्रकारे आणखी कोणाची फसवणूक झाली असल्यास त्यांनी लोहमार्ग पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश सिंग गौड यांनी केली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.