Kiwale News : वॉचमन महिलेचा चोरट्याने केला खून, रोख रक्कम आणि दागिने पळविले 

एमपीसी न्यूज – बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत वॉचमनचे काम करणाऱ्या महिलेचा चोरट्याने डोक्यात कशाने तरी हल्ला करत खून केला आहे. किवळे येथील ब्रिज जवळ बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत गुरुवारी (दि.16) सायंकाळी सहाच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. चोरट्यांने महिलेच्या अंगावरील दागिने आणि घरातील रोख रक्कम चोरुन नेली. 

सौंदव सोमेरु उराव (वय 40, रा. किवळे, मुळगाव- पश्चिम बंगाल) असं खून झालेल्या महिलेचे नाव आहे.
याप्रकरणी महिलेचा पती सोमेरु येतावा उराव (वय 45, रा. किवळे, मुळगाव- पश्चिम बंगाल) यांनी शुक्रवारी (दि.17) देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात इसमाविरोधात भारतीय दंड विधान कलम 302, 397 अंतर्गत खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत महिला आपल्या पतीसोबत किवळे येथे राहत होती. गुरुवारी सकाळी पती कामावर गेला. महिला देखील शेजारी बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत वॉचमनचे काम करत असल्याने तिथे कामाला गेली. दरम्यान, सायंकाळच्या सुमारास एक चोरटा याठिकाणी आला त्याने महिलेच्या डोक्यात कशाने तरी हल्ला करून गंभीर जखमी करत खून केला.
त्यानंतर महिलेचा मृतदेह तळमजल्यावरील लिफ्टच्या पाणी साचलेल्या खड्यात टाकून दिला. चोरट्याने महिलेच्या अंगावरील दागिने आणि घरातील तीस हजार रुपये चोरुन नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. देहूरोड पोलीस अधिक तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.