Pune News : रो हाऊसचे वीजबिल थकीत, वसुलीसाठी गेलेल्या महावितरणच्या तंत्रज्ञाला बापलेकाकडून ठार मारण्याची धमकी

एमपीसी न्यूज : वीजबिल थकीत असल्यामुळे वीज कनेक्शन कट करण्यासाठी गेलेल्या महावितरणच्या तंत्रज्ञाना एका व्यक्तीने ठार मारण्याची धमकी दिली. विमाननगर येथील यशोदानंदन सोसायटीत हा प्रकार घडला. विमानतळ पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुहास रामचंद्र गडकरी (वय 55) आणि अतुल सुहास गडकरी (वय 37) या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी महावितरणचे तंत्रज्ञ सुरेंद्रनाथ महादेव चौधरी यांनी फिर्याद दिली आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी हे विमान नगर येथील महावितरणच्या कार्यालयात तंत्रज्ञ पदावर कार्यरत आहे. विमान नगर मधील यशोदा नंदन सोसायटीतील रो हाऊस नंबर 20 मध्ये राहणारे गडकरी कुटुंबीयांचे वीज बिल थकीत होते. वारंवार सांगूनही वीज बिल भरले जात नसल्यामुळे फिर्यादी सुरेंद्र चौधरी हे वीज कनेक्शन कट करण्यासाठी शुक्रवारी दुपारच्या वेळी गेले होते.

यावेळी सुहास आणि अतुल गडकरी या दोघा बाप-लेकांनी फिर्यादीला शिवीगाळ करत तुम्ही इथे दिसाल तर तुम्हाला मारेल अशी ठार मारण्याची धमकी दिली आणि सरकारी कामात अडथळा निर्माण केला. तक्रार आल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून सुहास गडकरी यांना अटक केली आहे. अधिक तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.