Sangvi Crime News : एलआयसी मधून बोलत असल्याचे सांगून बनावट कागदपत्रे पाठवून एक लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – एका महिलेने पिंपळे गुरव येथील येथील एका व्यक्तीला फोन करून ती एलआयसी मधून बोलत असल्याचे सांगून एलआयसी बॉण्ड योजनेबाबत माहिती देऊन फोन कट केला. त्यानंतर फोनवरील महिला आणि तिच्यासोबत आणखी महिला पिंपळे गुरव येथे घरी येऊन त्या व्यक्तीकडून एक लाखांचा धनादेश घेऊन गेल्या. पावतीची पाठपुरावा केला असता बनावट कागदपत्रे पाठवून व्यक्तीची एक लाख रुपयांची फसवणूक केली. हा प्रकार 15 फेब्रुवारी ते 22 ऑक्टोबर 2021 या कालावधीत सुदर्शननगर, पिंपळे गुरव येथे घडला.

देविदास तुकाराम लोंढे (वय 46, रा. पिंपळे गुरव) यांनी याप्रकरणी रविवारी (दि. 31) सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार दोन महिलांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका आरोपी महिलेने फिर्यादी लोंढे यांना फोन केला. तिने ती एलआयसी मधून बोलत असल्याचे सांगून एलआयसी बॉण्ड म्हणून एक चांगली योजना आहे. तुम्ही या योजनेमध्ये गुंतवणूक करता का, तुम्ही गुंतवलेल्या रकमेवर तुम्हाला वर्षाला साडेनऊ टक्के पैसे मिळतील. त्यानंतर महिलेने फोन कट केला.

काही दिवसांनी फोन वरील आरोपी महिला आणि तिच्यासोबत आणखी एक महिला लोंढे यांच्या घरी आल्या. त्यांनी एलआयसी बॉण्डबाबत माहिती दिली आणि लोंढे यांना गुंतवणूक करण्यास भाग पाडले. लोंढे यांनी एक लाख रुपयांचा धनादेश आरोपी महिलांना दिला. त्यानंतर लोंढे यांनी आरोपींकडे पावती मिळण्यासाठी पाठपुरावा केला. मात्र आरोपींनी लोंढे यांचा फोन घेणे टाळले.

काही दिवसांनी लोंढे यांना एक एलआयसी पावती आली. त्या पावती बाबत त्यांनी शिवाजीनगर, पुणे येथील एलआयसी ऑफिसमध्ये जाऊन खात्री केली असता त्यांची पावती बनावट असल्याचे निदर्शनास आले. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.