UPSC CDS Exam : यूपीएससीच्या सीडीएस परीक्षेत वडगावच्या आदित्य गायकवाड याने मिळवला देशात 20 वा रॅंक

एमपीसी न्यूज – केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून (यूपीएससी) घेतल्या जाणाऱ्या ‘कम्बाइन्ड डिफेन्स सर्व्हिसेस’ (CDS) परीक्षेत (UPSC CDS Exam) वडगाव मावळ येथील आदित्य विवेक गायकवाड देशात 20 वा आला आहे. आदित्य लवकरच डेहरादून येथील इंडीयन मिलिटरी अकॅडमी येथे प्रशिक्षणासाठी रुजू होत आहे. त्याच्या यशाने वडगावच्या नावलौकीकात आणखी भर पडली आहे.

‘कम्बाइन्ड डिफेन्स सर्व्हिसेस’ (CDS)  ही परीक्षा (UPSC CDS Exam) पदवीनंतर संरक्षण दलात रुजू होण्यासाठी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून घेतली जाते. या परिक्षेच्या माध्यमातून तरुणांना लष्कराच्या तिन्ही दलांत अधिकारी होण्यासाठीची संधी मिळते. या परीक्षेतील गुणांच्या आधारे उमेदवारांना ‘एसएसबी’ मुलाखतीसाठी बोलवले जाते.

या मुलाखतीत विविध प्रकारच्या चाचण्यांनंतर त्यांची वैद्यकीय चाचणी होते. त्यानंतर मूळ प्रवेश परीक्षा, मुलाखत व वैद्यकीय चाचणी, या तिन्ही गुणांच्या आधारे उमेदवारांची अंतिम राष्ट्रीय गुणवत्ता श्रेणी (रँकिंग) ठरते व अंतिम प्रशिक्षणासाठी निवड होते. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वतीने सीडीएस परिक्षेचा (UPSC CDS Exam) निकालांची नुकतीच घोषणा केली. यामध्ये आदीत्य गायकवाड देशात विसावा आला आहे. संरक्षण दलात अधिकारी होण्यासाठी प्रवेश परिक्षा ही अत्यंत अवघड मानली जाते. मात्र आदीत्यने सीडीएस परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात यश मिळवले.

HSC Result 2022 Update : बारावीचा निकाल जाहीर! यंदाही मुलींचीच बाजी

यावर्षी देशभरातून जवळपास दोन लाख विद्यार्थ्यांनी प्रवेश परिक्षा दिली होती. त्यापैकी साडेचार हजार विद्यार्थी लेखी परिक्षेसाठी पात्र ठरले. यापैकी केवळ 142 विद्यार्थांची निवड झाली आहे. आदीत्यने औरंगाबादच्या देवगिरी इन्स्टिट्युट आॅफ इंजिनीअरींग अॅंड मॅनेजमेंट स्टडीज येथे ‘बी टेक’ पदवी घेतली आहे.

वडगाव मावळ येथे लहानाचे मोठे झालेले आदित्यचे वडील कर्नल विवेक गायकवाड हे सध्या आसाम येथे कर्तव्यावर आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आदित्य याने हे यश कुठल्याही शिकवणीविना मिळवले आहे. वडगावकरांसाठी ही अभिमानास्पद बाब आहे. इंडीयन मिलिटरी अकादमी, डेहराडून येथे प्रशिक्षण पुर्ण झाल्यानंतर आदित्य भारतीय नौदल अकादमीमध्ये कार्यकारी शाखेत रुजू होणार आहे. कमिशनिंग झाल्यावर तो सशस्त्र दलातील त्यांच्या कुटुंबातील दुसऱ्या पिढीतील अधिकारी असणार आहे.

नेव्हल पायलट होण्याचे स्वप्न

आदित्य आपल्या यशाबद्दल म्हणाला, इतर कोणी आपल्यावर विश्वास ठेवण्याआधी, आपण स्वतःवर विश्वास ठेवला पाहिजे. स्वतःवरील दृढ विश्वास, परिश्रम आणि समर्पण याने ध्येय साध्य होते असे मत व्यक्त करत नेव्हल पायलट होण्याचे आपले स्वप्न असल्याचे आदित्य म्हणाला. बी टेक पदवी प्राप्त केल्यानंतर पदव्युत्तर अभ्यासासाठी जर्मनी येथील स्काॅलरशिप सोडून आदित्यने देशसेवेसाठी सैन्य दलात भरती होण्याचा निर्णय घेत ‘कम्बाइन्ड डिफेन्स सर्व्हिसेस’ (CDS) परिक्षेची तयारी करत यश प्राप्त केले असल्याचे आदीत्य याचे वडील कर्नल विवेक गायकवाड म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.