Pune News : रस्त्यावर येऊन नमाज पढण्याचा अधिकार कुणी दिला? राज ठाकरेंच्या सभेचा दुसरा टीजर

एमपीसी न्यूज : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची उद्या पुण्यात जाहीर सभा होणार आहे. स्वारगेट परिसरातील गणेश कला क्रीडा रंगमंच या ठिकाणी ही सभा पार पडणार आहे. या सभेचा दुसरा टिझर आता मनसेकडून जाहीर करण्यात आला आहे.

या टिझरमध्ये राज ठाकरे यांच्या आधीच्या भाषणातील वाक्य घेण्यात आले आहे. ‘मी धर्मांध नाही तर धर्माभिमानी आहे, माझा कुणाच्या प्रार्थनेला विरोध नाही पण तुम्ही आम्हाला त्रास देऊ नका”, रस्त्यावर येऊन तुम्ही नमाज पडता कुणी अधिकार दिले तुम्हाला, अजुन मी माझ्या भात्यातील बाण काढलेला नाहीये तो काढण्यास मला भाग पाडू नका” अस ते या टीजर मध्ये म्हणताना दिसत आहे. त्यामुळे मनसेचा हा दुसरा टीजर पाहता राज ठाकरेंची पुण्यातील ही सभा वादळी ठरणार यात शंका नाही.

मागील दोन दिवसांपासून राज ठाकरे यांची पुण्यातील सभा होणार की नाही होणार अशा चर्चा सुरू होत्या. पुण्यातील मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडून डेक्कन परिसरातील भिडे पुलानजीक असणाऱ्या नदीपात्रात आणि सप महाविद्यालयाच्या मैदानावर सभेसाठी परवानगी देखील मागितली होती. त्यातील नदीपात्रातील सभेसाठी परवानगी देखील देण्यात आली होती. मात्र खराब हवामानाचा अंदाज आणि पाऊस पडण्याची शक्यता यामुळे नदीपात्रातील सभा रद्द करण्यात आली होती. त्यानंतर आता गणेश कला क्रीडा रंगमंच या ठिकाणी राज ठाकरे यांची जाहीर सभा पार पडणार आहे आहे.

राज ठाकरे पुण्यातील दोन दिवसीय दौरा संपवून नुकतेच मुंबईला परतले. आणि त्यानंतर आज या सभेची घोषणा करण्यात आली. येत्या 5 जून रोजी राज ठाकरे आयोध्या दौऱ्यावर जाणार होते. परंतु राज ठाकरे यांचा हा दौरा अचानक रद्द करण्यात आला. राज ठाकरे यांचा अयोध्या दौऱ्याला यूपीतील खासदार ब्रिजभूषण सिंह यांच्यासह काही साधुसंतांनी विरोध केला होता. या सर्वांचा राज ठाकरे आपल्या भाषणातून समाचार घेतील अशी शक्यता देखील वर्तवली जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.