Pune News : वानवडीतील उच्चभ्रू सोसायटीच्या आठव्या मजल्यावरुन उडी मारून विवाहितेची आत्महत्या

एमपीसी न्यूज – पुण्याच्या वानवडी परिसरात इमारतीच्या आठव्या मजल्यावरून उडी मारून एका 32 वर्षीय विवाहितेने आत्महत्या केली. मंगळवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. कल्याणी अजितकुमार प्रधान (वय 32) असे आत्महत्या केलेल्याचे विवाहितेचे नाव आहे. वानवडी पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वानवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ड्रीम्स आकृती ही उच्चभ्रू सोसायटी आहे. या सोसायटीच्या आठव्या मजल्यावर प्रधान दाम्पत्य राहतात. तीन वर्षांपूर्वी कल्याणी आणि अजित कुमार यांचा विवाह झाला होता. अजित कुमार हे सॉफ्टवेअर इंजिनिअर आहेत. मंगळवारी दुपारच्या सुमारास कल्याणी यांनी इमारतीच्या आठव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली.

दरम्यान, घटनेची माहिती मिळाल्यानंतर वानवडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेह ससून रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला. कल्याणी यांनी आत्महत्या का केली हे मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. वानवडी पोलिस या घटनेचा अधिक तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.