Nigdi Crime News : ट्रकच्या धडकेत होमगार्डचा मृत्यू
एमपीसी न्यूज – भरधाव वेगात आलेल्या एका ट्रकने एका दुचाकीला जोरात धडक दिली. या धडकेत दुचाकीस्वार होमगार्डचा मृत्यू झाला. हा अपघात रविवारी (दि. 12) सकाळी साडेआठ वाजता पवळे ब्रिजवर, निगडी येथे घडला.
तेजस ओमप्रकाश लेले (वय 32, रा. माळीनगर, वडगाव मावळ) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वार होमगार्डचे नाव आहे. याप्रकरणी देवेंद्र अरुण कुरुमभट्टी (वय 35, रा. तळेगाव दाभाडे) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात ट्रक चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा आते भाऊ मयत तेजस लेले हे होमगार्ड होते. रविवारी सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास ते निगडी येथील पवळे उड्डाणपुलावरून दुचाकीवरून जात होते. त्यावेळी एका अज्ञात ट्रक चालकाने भरधाव वेगात, निष्काळजीपणे ट्रक चालवून तेजस यांच्या दुचाकीला धडक दिली. यामध्ये तेजस गंभीर जखमी झाले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. अपघात झाल्यानंतर वाहन चालक घटनास्थळी न थांबता निघून गेला. निगडी पोलीस याप्रकरणी तपास करीत आहेत.