Chinchwad News : विद्यार्थ्यांनी सायन्स पार्कमध्ये अनुभवला शून्य सावली दिवस

एमपीसी न्यूज – चिंचवड मधील सायन्स पार्क येथे विद्यार्थ्यांनी शनिवारी (दि. 14) शून्य सावली दिवस अनुभवला. शून्य सावली दिवस हा शब्दच कुतूहल निर्माण करणारा असून या दिवशी वर्षभर सोबत राहणारी आपली सावली काही मिनिटांसाठी आपल्याला सोडून जाते. महाराष्ट्रात 3 ते 31 मे पर्यंत असे शून्य सावली दिवस अनुभवता येणार आहेत.

सूर्याचा उत्तरायण आणि दक्षिणायन असा भासमान मार्ग पृथ्वीच्या 23.50 अक्षांश दक्षिण आणि उत्तरेकडे असतो. म्हणजेच कर्कवृत्त आणि मकरवृत्त ह्या दरम्यान असणाऱ्या सर्व भूभागावर सूर्य वर्षांतून दोनदा दुपारी डोक्यावर येतो आणि दोनदा शून्य सावली दिवस येतात. सूर्य आणि पृथ्वी ह्यांतील कोनीय व्यास आणि अंशात्मक अंतर जिथे जुळते, तिथे शून्य सावली दिवस घडतो.

उत्तरायण होताना एकदा आणि दक्षिणायन होताना एकदा; तसेच सूर्य दररोज 0.50 अंश सरकतो म्हणजे तो एकाच अक्षवृत्तावर दोन दिवस राहतो. त्यामुळे एकाच ठिकाणावरून दोन दिवस शून्य सावली अनुभवता येते. महाराष्ट्रात 3 ते 31 मे पर्यंत शून्य सावली दिवस आहेत.

एका अक्षांशवर येणाऱ्या सर्व परिसरात त्याच दिवशी शून्य सावली दिवस येतात. महाराष्ट्रातील वेगवेगळय़ा अक्षवृत्तावर वेगळे दिवस आणि वेळा आहेत, त्यामुळे सर्व शहरे आणि गावांच्या वेळांत काही सेकंदांचा फरक आहे. त्यामुळे दुपारी 12 ते 12.35 दरम्यान सूर्यनिरीक्षण करावे. समुहासाठी हा उपक्रम सायन्स पार्क मध्येही आयोजित करण्यात आला. शनिवारी (दि. 14) दुपारी 12.32 वाजता सायन्स पार्क येथे शून्य सावलीचा अनुभव नागरिकांनी घेतला. या प्रसंगी मोठ्या प्रमाणात नागरिक व विद्यार्थी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.