Manobodh by Priya Shende Part 82 : मनोबोध भाग 82 – बहु नाम या रामनामी तुळेना

एमपीसी न्यूज : मनोबोध भाग 82 – Manobodh by Priya Shende Part 82

बहु नाम या रामनामे तुळेना

अभाग्या नरा पामारा हे कळेना

विषा औषध घेतले पार्वतिशे

जिवा मानवा किंकरा कोण पुसे

पुन्हा एकदा रामनामाचा महिमा समर्थांनी या श्लोकात सांगितला आहे.

प्रत्येकाची आपली आपली श्रद्धास्थानं असतात. कोणी गणपतीची भक्ती करतात, कोणी दत्त महाराजांचे भक्त असतात, कोणी देवीची भक्ती करतात, तर कोणी रामाची, मारुतीची, विठ्ठलाची, शंकराची भक्ती करतात. प्रत्येकाला आपला असा एक देव आवडत असतो, त्या देवाची भक्ती ते इतक्या भक्ती भावाने करत असतात, की त्यांच्यासाठी देव म्हणजे तोच जो त्यांच्या मनातला आहे. त्या देवापेक्षा दुसऱ्या कोणाची ते फारशी भक्ती करत नाहीत. कारण त्यांच्या दृष्टीने तो एकच देव आहे, त्याची तुलनाच कोणासोबत होऊ शकत नाही.

समर्थ रामदास देखील सगुण रूपात श्रीरामांनाच बघतात. पुजतात. त्यामुळे ते म्हणतात की “बहु नाम या रामनामी तुळेना”. सगळ्यात सोपा सहज सरळ म्हणजे नामस्मरणाचा मार्ग आहे. त्यामुळे ते सांगतात की राम नाम सदैव मुखी चित्ती असू द्या.

ते प्रभू रामचंद्रना भजतात त्यामुळे ते रामनाम घेण्यासाठी आग्रह करतात. ज्याला जो देव प्रिय आहे त्याने त्याचे नामस्मरण करावे. इतकी साधी आणि सोपी हे नामस्मरणाची भक्ती आहे, असं ते सांगतात.

पुढं ते म्हणताहेत की, “अभाग्या नरा पामारा हे कळेना”. पण हीच साधी गोष्ट बिचार्‍या माणसांना कळत नाही. समर्थांनी अशा माणसांना पामर म्हणजे बिचारा, अभागी असे म्हटलंय.

कारण ते नामस्मरण सोडून भलत्या, अवघड, न झेपणाऱ्या मार्गाला लागतात. मग या साधना अर्धवटच राहतात. त्यात उगीच वेळ व्यर्थ वाया दवडतात. त्यासाठी योग्य वेळी गुरु भेटणं पण तितकंच आवश्यक (Manobodh by Priya Shende Part 82) असतं. नाहीतर साधना नीट घडत नाही. त्यांना कमनशिबी म्हणावं. बहुतांशी माणसं प्रपंचातच गुंतलेली असतात. त्यांना हा नामस्मरणाचा सोपा मार्ग समोर दिसत असतो, तरी त्याकडे जायची इच्छाही होत नाही. म्हणूनच समर्थांनी अशा माणसांना अभागी, पामर म्हटलंय.

नामस्मरणाचं महत्त्व सांगताना त्यांनी पुराणातील कथेचा संदर्भ घेतलाय.

पुरणकाळात जेव्हा देव आणि दानव यांनी केलेल्या समुद्रमंथनातून विष बाहेर आलं. त्या विषामुळे जगातील सर्व प्राणीमात्रं तडफडू लागले. त्यामुळे जगाच्या रक्षणासाठी भगवान शंकरांनी विष प्राशन केलं. त्यामुळे त्यांचा कंठ म्हणजे गळा निळा झाला, म्हणून त्यांना निळकंठ असं नाव पडलं. त्या विषामुळे त्यांच्या देहाचा दाह सुरू झाला. तो दाह जावा म्हणून जटेमध्ये शीतल असा चंद्र धारण केला. त्यानेही दाह शमेना. म्हणून मस्तकी थंड गंगा धारण केली. तरीही दाह कमी होईना. मग शेवटी त्यांनी जालीम विषावर औषध म्हणून रामनाम कंठात धारण केलं. तेव्हा त्यांचा दाह शांत झाला.

हेच उदाहरण आपल्याला समर्थांनी दिलंय, की प्रत्यक्ष भगवान शंकरांनी विषावर जालीम औषध म्हणून रामनाम कंठात धारण केलं, तर आपण तर अगदीच कीडा मुंगी प्रमाणे सामान्य आहोत. नगण्य आहोत. म्हणूनच ते म्हणतात की, “विषा औषध घेतले पार्वतीशे (शंकर भगवान), जीवा मानवा किंकरा कोण पुसे”.

म्हणून (Manobodh by Priya Shende Part 82) समर्थांनी आपल्याला सांगितलंय की रामनाम आहेत जालीम औषध आहे. कोणत्याही आजारावर अचूक उपाय असेल तर त्याला रामबाण उपाय म्हणतो. त्याचप्रमाणे समर्थ हे उपदेश करत आहेत की, रामनाम हाच रामबाण उपाय आहे. त्याचीच कास धरा आणि आपला उत्कर्ष करून घ्या. तोच संसाराचा भवसागर पार करून नेईल आणि मोक्षाचा मार्ग दाखवेल.

जय जय रघुवीर समर्थ

प्रिया शेंडे

मोबाईल 7020496590

Pune: पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते महापालिकेच्या विविध प्रकल्पांचे उद्घाटन

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.