Hinjawadi News : अल्पवयीन मुलीचे अपहरण आणि लैंगिक अत्याचार; गरोदर राहिलेल्या अल्पवयीन मुलीचा मृत्यू

एमपीसी न्यूज – अज्ञात व्यक्तीने एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. त्यामुळे अल्पवयीन पीडित मुलगी गरोदर राहिली. सात महिन्यांची गरोदर असताना तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही घटना ऑक्टोबर 2020 ते मे 2021 या कालावधीत मुळशी तालुक्यातील साळुंखे वस्ती माणगाव येथे घडली. याप्रकरणी सुरुवातीला आटपाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांनतर हा गुन्हा हिंजवडी पोलिसांकडे तपासासाठी वर्ग करण्यात आला. त्यानुसार 31 जुलै 2021 रोजी हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पीडित अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फुस लावून पळवून नेले. त्यानंतर ती अल्पवयीन असल्याचे माहिती असताना तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. यात अल्पवयीन मुलगी गरोदर झाली. यामुळे तिच्या जीवाला धोका निर्माण झाला. त्यातच तिचा मृत्यू झाला.

याबाबत भारतीय दंड विधान 363, 376, 376 (अ), 376 (3) पोक्सो कायदा कलम 4, 6 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.