Talegaon News : कॉलेजमध्ये पाठलाग करत तरुणीशी गैरवर्तन; तरुणाला अटक

एमपीसी न्यूज – मैत्री करण्याची मागणी करत तरुणाने एका तरुणीचा वारंवार पाठलाग केला. कॉलेजमध्ये तरुणीचा रस्ता आडवून कॉलेज संपल्यानंतर भेट, नाहीतर तुझा जीव घेईन, अशी धमकी दिली. ही घटना बुधवारी (दि. 29) तळेगाव दाभाडे येथे घडली. तरुणीच्या फिर्यादीनंतर पोलिसांनी आरोपी तरुणाला अटक केली आहे.

शिवम विनोद शेळके (वय 20, रा. तळेगाव दाभाडे, ता. मावळ) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी 17 वर्षीय पीडित तरुणीने तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील सहा ते सात महिन्यांपासून शिवम शेळके याने पीडित तरुणीकडे मैत्री करण्याची मागणी करत पाठलाग केला. शिवम याचे तरुणीने फोन उचलले नाहीत, तसेच त्याच्या मेसेजला रिप्लाय दिला नाही त्यामुळे त्याने वेगवेगळ्या नंबरवरून मेसेज व फोन केले.

शिवमचा फोन उचलला नाही, तर घरात येईन, सर्वांना बघून घेईन अशी त्याने तरुणीला धमकी दिली. बुधवारी तरुणी कॉलेजमध्ये गेली असता शिवमने तिचा पाठलाग केला. वर्गात जात असताना तिचा रस्ता अडवून शिवम याने हात पकडला आणि ‘कॉलेज संपल्यानंतर मला येऊन भेट, नाहीतर मी तुझा जीव घेईन’ अशी धमकी दिली. याप्रकरणी तरुणीने पोलिसात धाव घेत गुन्हा नोंदवला. सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.