Chinchwad News : अभिनेते चिन्मय मांडलेकर यांना ‘कलागौरव’ पुरस्कार जाहीर; शनिवारी वितरण

एमपीसी न्यूज – कलारंग सांस्कृतिक कला संस्थेच्या वतीने उल्लेखनीय कार्याबद्दल मराठी कलाकारांना देण्यात येणारा ‘कलागौरव’ पुरस्कार यंदा प्रसिद्ध लेखक, पटकथाकार, अभिनेते चिन्मय मांडलेकर यांना देण्यात येणार असल्याचे संस्थेचे अध्यक्ष अमित गोरखे यांनी सांगितले. पुरस्कारानंतर प्रसिद्ध अभिनेते राहूल सोलापूरकर हे चिन्मय मांडलेकर यांचा नाटक व चित्रपट सृष्टीतील प्रवासाविषयी प्रकट मुलाखत घेणार आहेत.

पुरस्काराचे वितरण येत्या शनिवारी (दि.16) सकाळी 11 ते 2 या वेळेत चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे नाटयगृहात होणार आहे. माजी मंत्री, आमदार आशिष शेलार यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. स्मृतिचिन्ह, शाल आणि श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरुप आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील कला, सांस्कृतिक, नाट्य क्षेत्रातील 6 प्रतिभावान कलाकारांना ‘कलागौरव’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. संस्थेचे पुरस्काराचे हे 23 वे वर्ष आहे.

अमित गोरखे म्हणाले, “कलारंग संस्था पिंपरी – चिंचवड मध्ये सांस्कृतिक क्षेत्रात गेल्या 22 वर्षांपासून कार्यरत आहे. मराठी कलावंतांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘कलागौरव’ पुरस्कार दिला जातो. मागील वर्षी प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांना हा पुरस्कार देऊन त्यांची प्रकट मुलाखत घेण्यात आली होती. आत्तापर्यंत सचिन पिळगांवकर, अशोक सराफ, रिमा लागू, सुप्रिया पिळगांवकर, महेश कोठारे, अशा 150 पेक्षा जास्त कलाकारांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे”.

कार्यक्रमास आमदार लक्ष्मण जगताप, आमदार महेश लांडगे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम महाराष्ट्र कार्यावह डॉ. प्रवीण दाबडघाव व पुणे विभाग कार्यावह श्री. मुकुंद कुलकर्णी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. याप्रसंगी पिंपरी-चिंचवड मधील लेखक, दिग्दर्शक, अभिनेता, वॉईस ओवर आर्टिस्ट आकाश थिटे, थिएटर आर्टिस्ट रश्मी घाटपांडे, संगीतकार, संगीत संयोजक तेजस चव्हाण, गायक निषाद सोनकांबळे, अभिनेत्री प्रगल्भ कोळेकर, गायक रविंद्र कांबळे या कलाकारांनाही पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.