Agneepath Scheme : कोण बनू शकतो अग्निवीर? महिलांपासून पगारापर्यंतची तरतूद; वाचा सविस्तर

एमपीसी न्यूज : भारतीय लष्करातील भरतीबाबत (Agneepath Scheme) आतापर्यंतचा सर्वात मोठा बदल झाला आहे. अग्निपथ योजनेअंतर्गत अग्निवीरची आता लष्कर, नौदल आणि हवाई दलात भरती केली जाणार आहे.  भरती केलेले हे सैनिक असतील, परंतु त्यांचा दर्जा सध्याच्या पदापेक्षा वेगळा असेल. त्यांना अग्निवीर म्हटले जाईल. हे अग्निवीर चार वर्षे लष्कर, नौदल किंवा हवाई दलात कार्यरत असतील. यापैकी जास्तीत जास्त 25% अग्निवीरांना नंतरच्या टप्प्यावर कायमस्वरूपी होण्याची संधी दिली जाईल. सैन्यात भरतीसाठी 90 दिवसांत पहिला भरती मेळावा होणार आहे. पहिल्या टप्प्यात लष्करासाठी 40 हजार, नौदलासाठी 3 हजार आणि हवाई दलासाठी 3 हजार 500 अग्निवीरांची भरती केली जाणार आहे.

ब्रिटिशकालीन व्यवस्था संपेल – Agneepath Scheme

ज्यांचे वय 17 ते 21 वर्षे दरम्यान आहे, तेच अग्निवीर भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत. त्यांचे प्रशिक्षण सध्याच्या रेजिमेंट प्रशिक्षण केंद्रांमध्येच केले जाईल. त्यासाठी या केंद्रांमध्ये पायाभूत सुविधा वाढविण्यात येत आहेत. भरतीनंतर, अग्निवीरांना सैन्याच्या गरजेनुसार कुठेही नियुक्त केले जाऊ शकते. सैन्यात अग्निवीरांची भरती अखिल भारतीय सर्व वर्गांच्या आधारे केली जाईल. भरती झाल्यानंतर, त्यांना सैन्याच्या कोणत्याही रेजिमेंट किंवा युनिटमध्ये पाठवले जाऊ शकते. अग्निपथ योजनेसोबतच ब्रिटिशकालीन भारतीय लष्करातील रेजिमेंटल सिस्टिममध्येही बदल होणार आहेत.

पाहा निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन काय म्हणतात…

सध्या तरुणांना शीख रेजिमेंट, राजपूत रेजिमेंट, मराठा रेजिमेंट किंवा जाट रेजिमेंटमध्ये सैनिक म्हणून घेतले जाते. अग्निपथ योजनेंतर्गत, अखिल भारतीय अखिल श्रेणीच्या आधारावर भरती केली जाईल. यावर लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे म्हणाले की, कमी-अधिक प्रमाणात अखिल भारतीय सर्व वर्ग आहे. लष्कराच्या 75 टक्के तुकड्यांमध्ये अखिल भारतीय सर्व श्रेणीचा घटक आहे. रेजिमेंट प्रणाली बदलण्याचा उद्देश भरतीचा पाया रुंदावणे हा आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातील तरुणांना संधी दिली जाईल.

Neeraj Chopra : ऑलिम्पिकवीर नीरज चोप्रा याने रचला पुन्हा विक्रम; सुवर्णपदकाची हुलकावणी

नौदलात महिलाही होणार अग्निवीर

अग्निपथ योजनेअंतर्गत भारतीय नौदलातील महिलाही अग्निवीर बनू शकणार आहेत. आतापर्यंत भारतीय नौदलात अधिकारी पदावर फक्त महिला आणि नाविक पदावर फक्त पुरुष आहेत. अग्निपथ योजनेच्या घोषणेसह, भारतीय नौदल प्रमुख ॲडमिरल  आर. हरिकुमार म्हणाले, की ”आम्ही अग्निपथ योजनेत महिला खलाशांचाही समावेश करू.” नौदल प्रमुख म्हणाले की, ”गेल्या दीड वर्षांपासून महिला अधिकाऱ्यांनाही जहाजावर (युद्धनौकांमध्ये) नियुक्त करण्यात आले आहे. आम्ही तटस्थ सेवा देतो, त्यामुळे अग्निपथ अंतर्गत महिलांनाही संधी दिली जाईल.”

पगाराची सुरुवात 30 हजारांपासून – Agneepath Scheme

अग्निवीरांना पहिल्या वर्षी 30,000 रुपये मासिक वेतन मिळेल. दुसऱ्या वर्षी ३३ हजार, तिसऱ्या वर्षी ३६ हजार ५०० आणि चौथ्या वर्षी ४० हजार रुपये. पगाराव्यतिरिक्त जोखीम आणि कष्ट भत्ता, रेशन भत्ता, गणवेश आणि प्रवास भत्ता मिळेल. विशेष मनुष्यबळासाठी आयटीआय आणि इतर तांत्रिक संस्थांमधून तरुणांना घेतले जाईल. चार वर्षे पूर्ण झाल्यावर सैनिक बाहेर पडल्यावर त्यांना सेवानिधी मिळेल. यामध्ये दरमहा पगारातून 30 टक्के रक्कम कापली जाईल आणि तेवढीच रक्कम सरकार देईल. चार वर्षांत ही रक्कम 11 लाख 70 हजार रुपये होईल. यामध्ये कोणताही आयकर लागणार नाही. अग्निवीरला 48 लाख रुपयांचे आयुर्विमा संरक्षण असेल. यासाठी त्यांना त्यांच्या पगारातून योगदान द्यावे लागणार नाही. लाइफ इन्शुरन्स कवच व्यतिरिक्त, सेवेदरम्यान मृत्यू झाल्यास, उर्वरित सेवेसाठीचे वेतन आणि त्यावेळच्या सेवा निधीचा काही भाग यासह 44 लाख रुपयांची अनुग्रह देखील उपलब्ध असेल. जर, अपंगत्वामुळे सेवेबाहेर जावे लागले तर अपंगत्वाच्या आधारावर एकवेळ आर्थिक मदत देण्याचीही तरतूद करण्यात आलेली आहे.

पेन्शन नाही, माजी सेवेचा अधिकार नाही –

चार वर्षांची सेवा पूर्ण करून अग्निवीर बाहेर पडल्यावर त्याला कोणत्याही पेन्शन किंवा ग्रॅच्युइटीचा हक्क मिळणार नाही. सेवेदरम्यान त्यांना कौशल्य प्रशिक्षण दिले जाईल. चार वर्षांनी सर्व अग्निवीर बाहेर होतील. त्यानंतर यापैकी जास्तीत जास्त 25% लोकांना नियमित केडर म्हणून म्हणजेच कायमस्वरूपी सैन्यात सामील होण्याची संधी दिली जाईल. ते किती टक्के असेल, ते लष्कराच्या आवश्यकतेवर अवलंबून असेल. अशा स्थितीत युवक अग्निवीर का होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्याला उत्तर देताना हवाई दल प्रमुख म्हणाले की, आजही बारावीनंतर तरुण एकतर कौशल्य प्रशिक्षण घेतात किंवा उच्च शिक्षण घेतात किंवा नोकरी शोधतात. आम्ही तरुणांना एकाच वेळी तीनही संधी देत ​​आहोत. त्यांना चांगला पगार मिळेल, चार वर्षांत बँक बॅलन्स चांगला असेल. यासोबतच त्यांना कौशल्य प्रशिक्षणही दिले जाणार आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत त्यांना दिलेल्या औपचारिक प्रशिक्षणासाठी त्यांना क्रेडिट पॉइंट्स मिळतील. त्यातून ते चार वर्षांनी उच्च शिक्षण घेऊ शकतात. चार वर्षे सैन्यात राहिल्यानंतर तो अधिक आत्मविश्वासाने बाहेर पडेल.

सरकारने गेम चेंजर म्हटले, मात्र प्रश्न उपस्थित केले जात आहेत –

सरकारने अग्निपथ योजनेला गेम चेंजर म्हटले आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासोबतच लष्कर, नौदल आणि हवाई दल प्रमुखांनीही सांगितले की, यामुळे लष्कराला भविष्यातील आव्हानांना अधिक चांगल्या प्रकारे सामोरे जाणे शक्य होईल. सध्या लष्करातील सैनिकांचे सरासरी वय 32 वर्षे आहे. अग्निवीरांच्या आगमनानंतर, 6-7 वर्षात सरासरी वय 26 वर्षे होईल आणि सैन्य अधिक तरुण आणि तंदुरुस्त होईल. दररोज बदलणारे तंत्रज्ञान तरुण लोक पटकन शिकतील. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, भारतीय लष्कराला जगातील सर्वोत्तम सैन्य बनवण्यासाठी ‘अग्निपथ’ नावाची ऐतिहासिक योजना आणली आहे. ते म्हणाले की, तरुण नवीन तंत्रज्ञान लवकर शिकतील आणि त्यांची फिटनेस पातळीही चांगली असेल. त्यामुळे रोजगाराच्या संधी वाढतील. भारतीय अर्थव्यवस्थेला उच्च कुशल मनुष्यबळही मिळेल.

सशस्त्र सेना दलातील करिअरच्या संधी

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.