Chinchwad News : ‘कॅमेऱ्याची मालकी कुणाकडे’ या कारणावरून दोन तरुणांमध्ये वाद

रागाच्या भरात जाळली वाहने

0

एमपीसी न्यूज – दोन तरुणांनी दोघात मिळून घेतलेल्या कॅमेऱ्याची मालकी कुणाकडे, या कारणावरून दोघात भांडण झाले. त्यातील एकाने कॅमेरा आपल्याकडे ठेऊन घेतला. त्यामुळे दुसऱ्या तरुणाने कॅमेरा ठेऊन घेणाऱ्या तरुणाची दुचाकी जाळली. यामुळे परिसरातील काही दुचाकी आगीच्या भक्ष्यस्थानी सापडल्या. ही घटना आज (बुधवारी, दि. 13) पहाटे चिंचवड मधील काकडे टाऊनशिप येथे घडली.

प्रकरणातील दोन तरुणांनी दोघात मिळून हप्त्यावर कॅमेरा घेतला होता. त्यातील एक तरुण कॅमे-याचे हप्ते भरत नव्हता. त्यामुळे दुसऱ्या तरुणाने कॅमेरा आपल्याकडे ठेऊन घेतला. या कारणावरून हप्ते न भरणाऱ्या तरुणाने कॅमेरा ठेऊन घेणाऱ्या तरुणाची दुचाकी पेटवली. पेटवलेल्या दुचाकीची आग आसपासच्या इतर दुचाकींना लागली आणि त्यात सुमारे दहा दुचाकी जळून खाक झाल्या.

पहाटेच्या वेळी ही घटना घडली असून परिसरात धुराचे लोट पसरल्याने नागरिकांच्या हा प्रकार निदर्शनास आला. अग्निशमन विभागाला घटनेची माहिती मिळताच जवानांनी आग विझवली. मात्र तोपर्यंत वाहनांचा चुराडा झाला होता.

हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. पोलिसांच्या हाती घटनेचे सीसीटीव्ही फुटेज लागले असून त्यावरून पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले आहे. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.