Bhosari : बीएमडब्ल्यूवर लघुशंका करणाऱ्यास रोखल्याने सुरक्षा रक्षकाला पेट्रोल ओतून जाळण्याचा प्रयत्न

एमपीसी न्यूज – कंपनीत सुरक्षा रक्षक म्हणून काम करत असलेल्या एकाने मालकाच्या बीएमडब्ल्यू कारवर लघुशंका करणाऱ्यास रोखले. त्यावरून लघुशंका करणाऱ्याने सुरक्षा रक्षकाला पेट्रोल ओतून जाळण्याचा प्रयत्न केला. ही घटना भोसरी एमआयडीसीतील एस. व्ही. एटरप्रायझेस या कंपनीत मंगळवारी (दि. 17) दुपारी घडली.

भगवान शंकर वायफळकर (वय 41, रा. दत्तनगर, चिंचवड) असे गंभीररित्या भाजलेल्या सुरक्षा रक्षकाचे नाव आहे. त्यांनी याबाबत मंगळवारी (दि. 17) एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. महेंद्र बाळू कदम (वय 31, रा. बालाजीनगर, भोसरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी वायफळकर हे भोसरी एमआयडीसीतील एस. व्ही. एटरप्रायझेस या कंपनीत सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात. मंगळवारी दुपारी सव्वाचार वाजताच्या सुमारास आरोपी कदम हा फिर्यादी काम करीत असलेल्या कंपनीच्या मालकाच्या बीएमडब्ल्यू कारवर लघुशंका करीत होता. त्यास वायफळकर यांनी येथे लघुशंका करू नको, असे सांगितले.

या कारणावरून चिडलेल्या आरोपी कदम याने फिर्यादी वायफळकर यांच्या अंगावर पेट्रोल ओतून त्यांना पेटवून दिले. या घटनेत वायफळकर हे गंभीररित्या भाजले आहेत. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.