Pune News : पुणे रेल्वे स्थानकात बॉम्ब सदृश्य वस्तू आढळल्याने खळबळ

एमपीसी न्यूज – पुणे रेल्वे स्थानकावर आज सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास बॉम्ब सदृश्य वस्तू आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी संपूर्ण पुणे रेल्वे स्थानक रिकामे केले होते. त्यानंतर बॉम्ब शोधक व नाशक पथकाने शोध घेऊन जिलेटिनच्या तीन कांड्या ताब्यात घेतले आहेत. पुणे रेल्वे स्थानक परिसरात असलेल्या एका मैदानावर हा बॉम्ब निकामी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. घटनास्थळी पोलीस आयुक्त सुद्धा दाखल झाले आहेत

घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी येथे दाखल झाले आहेत. दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) धाव घेऊन पाहणी केली. अद्याप ही स्फोटके कोणी ठेवली याची माहिती मिळू शकलेली नाही. बंडगार्डन पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, शुक्रवारी सकाळच्या सुमारास पुणे रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक एक वर बॉम्ब सदृश्य संशयित वस्तू दिसून आली होती. याची माहिती तत्काळ पोलिसांना देण्यात आली. लगेच बंडगार्डन पोलिसांनी धाव घेतली. त्यापाठोपाठ बिडीडीएसही श्वान घेऊन दाखल झाले. तपासणी केल्यानंतर 3 जिलेटीनच्या कांड्या आढळून आल्या. त्यानुसार बिडीडीएस आणि बंडगार्डन पोलिसांनी त्या ताब्यात घेऊन जवळच्या एका मैदानात नेल्या. तेथे तो बॉम्ब निकामी करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.