Dehuroad News : कपाटात ठेवलेल्या परवाना धारक पिस्तुलातून सुटली गोळी; आई गंभीर जखमी

एमपीसी न्यूज – एका तरुणाकडे परवाना धारक पिस्तुल आहे. ते पिस्तुल कपाटात ठेवलेले असताना कपडे काढताना पिस्तुल कपाटातून खाली पडले आणि पिस्तुलातून गोळी झाडली गेली. ती गोळी कपाटाच्या दरवाजातून आरपार होऊन तरुणाच्या आईच्या पायाला लागली. यामध्ये आई गंभीर जखमी झाली. ही घटना मंगळवारी (दि. 24) रात्री अकरा वाजता मिडास रेसिडेन्सी कचरा डेपो समोर देहूगाव येथे घडली.

लता मराठे असे जखमी महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार किशोर दुतोंडे यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार लता यांचा मुलगा अक्षय शांताराम मराठे (वय 26, रा. मिडास रेसिडेन्सी, कचरा डेपो समोर, देहूगाव) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षय मराठे याच्याकडे परवानाधारक पिस्तुल आहे. ती त्यांनी त्यांच्या कपड्यांच्या कपाटात ठेवली होती. त्यांना मंगळवारी रात्री बाहेरगावी जायचे असल्याने ते टी शर्ट घालण्यासाठी शोधत होते. मात्र टी शर्ट मिळत नसल्याने त्यांनी त्यांच्या आईला आवाज दिला आणि टी शर्ट शोधण्यास सांगितले.

अक्षय हा कपाटातून त्याचा ड्रेस ओढून बाहेर काढत असताना कपड्यांवर ठेवलेले पिस्तुल खाली पडले आणि त्यातून एक गोळी झाडली गेली. ती गोळी कपाटाच्या दरवाजातून आरपार जाऊन आई लता यांच्या पायाला लागली. यात लता या जखमी झाल्या आहेत. याप्रकरणी अक्षय याने इतरांच्या जीवित किंवा व्यक्तिगत सुरक्षितता धोक्यात येईल अशी कृती केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.