Khed News : महिलेची फसवणूक; पाच तोळे सोन्याचे बिस्कीट म्हणून दिला लोखंडाचा तुकडा

एमपीसी न्यूज – राजगुरूनगर एसटी स्टॅन्ड समोर दोन ठगांनी एका महिलेला चांगलाच गंडा घातला आहे. पाच तोळे वजनाचे सोन्याचे बिस्कीट असल्याचे भासवून एका पुडीत बांधून लोखंडाचा तुकडा दिला आणि त्याच्या बदल्यात महिलेच्या गळ्यातील सोन्याचा डाग व मोबाईल फोन नेला. ही घटना शुक्रवारी (दि. 27) दुपारी तीन वाजताच्या सुमारास घडली.

जनाबाई दगडू सातपुते (वय 55, रा. काळेचीवाडी, बालघरेवस्ती, ता. खेड) यांनी याप्रकरणी खेड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन अनोळखी इसमांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शुक्रवारी दुपारी तीन वाजताच्या सुमारास पायी चालत राजगुरूनगर एसटी स्टॅन्डकडे जात होत्या. एसटी स्टॅन्ड समोर दोन अनोळखी ठगांनी फिर्यादी यांना गाठले. एक गुलाबी रंगाची पुडी जनाबाई यांच्या समोर धरून ‘त्यात पाच तोळे वजनाचे सोन्याचे बिस्कीट आहे. ते मी तुम्हाला देतो. त्या बदल्यात तुम्ही आम्हाला तुमच्या गळ्यातील सोन्याचा डाग आणि मोबाईल द्या’ अशी आरोपींनी जनाबाई यांच्याकडे मागणी केली.

अज्ञात इसमांवर जनाबाई यांनी विश्वास ठेऊन त्यांच्या गळ्यातील साडेतीन तोळ्याचे तीन पदरी गंठण आणि मोबाईल फोन दिला. आरोपींनी जनाबाई यांना गुलाबी रंगाची पुडी दिली आणि साडेतीन तोळ्याचे गंठण व मोबाईल घेऊन पसार झाले. जनाबाई यांनी काही वेळाने ती पुडी उघडून बघितली असता त्यात लोखंडाचा तुकडा आढळला. आपली फसवणूक झाली असल्याचे समजताच त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत गुन्हा नोंदवला. खेड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.