Pimpri News : नागरिक, पत्रकार वेटिंगवर; अतिरिक्त आयुक्तांचे भाजपच्या नेत्यासोबत ‘गुफ्तगू’!

एमपीसी न्यूज – प्रशासकीय राजवट लागू झाल्यानंतर अधिका-यांनी लगेचच आपले रंग दाखवायला सुरुवात केली आहे. अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांना भेटण्यासाठी नागरिक, पत्रकार वेटिंगवर थांबले असताना ढाकणे मात्र भाजपच्या एका नेत्यासमेवत अँटी चेंबरमध्ये गप्पा मारत बसले होते. पत्रकार बाहेर थांबले असल्याची त्यांना कल्पना देऊनही त्यांनी दाद दिली नाही. त्यामुळे प्रशासकीय राजवटीचा नागरिकांना प्रत्यय येऊ लागला आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील नगरसेवकांचा पाच वर्षांचा कार्यकाळ रविवारी संपुष्टात आला. सोमवारपासून प्रशासकीय राजवट सुरु झाली आहे. आयुक्त राजेश पाटील हेच प्रशासक असणार आहेत. आयुक्तांनी आपल्यानंतर सर्व अधिकार आपले विश्वासू असलेल्या आणि रेल्वे सेवेतून आलेल्या अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांना बहाल केले आहेत. त्यामुळे ‘विकास’ ढाकणे यांची चलती राहते. ठेकेदार, लोकप्रतिनीधी यांची ढाकणे यांच्याच कार्यालयात वर्दळ असते.

प्रशासकीय राजवट सुरु झाल्याने अधिका-यांवर लोकप्रतिनीधींचा अंकुश राहिला नाही. त्यामुळे अधिकारी आपल्या मनाप्रमाणे वागू लागले आहेत. आज त्याचाच प्रत्यत आला. प्रशासकीय राजवटीचा आज दुसरा दिवस होता. आयुक्त राजेश पाटील पुण्यात एक बैठकीला गेले होते. त्यामुळे नागरिक, पत्रकार अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांना भेटण्यासाठी थांबले होते. पण, ढाकणे हे भाजपच्या एका नेत्यासोबत अँटी चेंबरमध्ये बसले होते. बाहेर पत्रकार, नागरिक थांबल्याची त्यांना कल्पना देऊनही त्यांनी दाद दिली नाही. भाजप नेता आणि त्यांच्यातील अर्ध्यातासापासून अधिक वेळ गुफ्तगु सुरुच होते. प्रशासकीय राजवटीत अधिकारी असे वागू लागले. तर, सर्वसामान्यांना वाली कोण राहणार असा सवाल उपस्थित होत आहे.

”भाजपचे एक नेते खूप वेळ थांबले होते. त्यांना अँन्टी चेंबरमध्ये बसण्यासाठी सांगितले. समोरील लोक गेल्यानंतर त्यांच्याशी चर्चा करत होतो” असे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.