Moshi News : टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू; सहप्रवासी गंभीर जखमी

एमपीसी न्यूज – पुणे-नाशिक महामार्गावर तुपेवस्ती मोशी येथे एका टेम्पोने दुचाकीला पाठीमागून धडक दिली. यामध्ये दुचाकी चालवणाऱ्या तरुणाचा मृत्यू झाला. तर दुचाकीवरील सहप्रवासी तरुण गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात सोमवारी (दि. 29) रात्री पावणे आठ वाजताच्या सुमारास घडला.

संतोष शिंदे असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. तर हनुमंत बालाजी आगलावे (वय 22, रा. वासोली, चाकण) असे जखमी तरुणाचे नाव आहे. हनुमंत आगलावे यांनी याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आयशर टेम्पो चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री पावणे आठ वाजताच्या सुमारास फिर्यादी हनुमंत आणि त्यांचा मित्र संतोष शिंदे असे दुचाकीवरून भोसरीकडे जात होते. ते तुपे वस्ती येथे आले असता त्यांच्या दुचाकीला आयशर टेम्पोने पाठीमागून धडक दिली. यामध्ये फिर्यादी हनुमंत यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली. तर दुचाकी चालवणारा त्यांचा मित्र संतोष शिंदे यांचा मृत्यू झाला. अपघाताची माहिती न देता टेम्पो चालक पळून गेला. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.