Pimpri news: शहरातील विकासकामांचा वेग मंदावला! सिमेंटचे रस्ते अर्थवट स्थितीतीत

एमपीसी न्यूज  – कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे परराज्यातील कामगारांनी पलायन केले आहे. परिणामी, पिंपरी-चिंचवड महापालिकेने हाती घेतलेल्या शहरातील विविध विकास कामांचा वेग मंदावला आहे. अनेक कामे ठप्प झाली आहेत. शहराच्या अनेक भागातील रस्ते डांबरीकरण, सिमेंट काँक्रीटीकरण करण्यासाठी खोदून ठेवले आहेत. कामगार नसल्याने रस्त्याची काम संथ गतीने सुरू आहेत. 

मागील वर्षीची कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आल्यानंतर पिंपरी-चिंचवड महापालिकेने पुन्हा काही विकास कामे करण्यास सुरुवात केली होती. मोठ मोठ्या प्रकल्पाच्या कामांना गती देण्यास सुरुवात केली. शहराच्या विविध भागांतील रस्त्याचे डांबरीकरण, सिमेंट काँक्रीटीकरणाचे काम हाती घेतले होते. त्यासाठी रस्ते खोदाई केली. स्मार्ट सिटीच्या कामासाठीही रस्ते खोदले आहेत.

कामांना सुरुवात झाली. पण, फेब्रुवारीच्या मध्यापासून पुन्हा पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला. बघता बघता परिस्थितीत गंभीर झाली. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आणि लॉकडाउनच्या भीतीने अनेक कामगारांनी आपल्या मूळगावी जाणे पसंत केले. परिणामी, त्याचा महापालिकेच्या चालू असलेल्या विकास कामांवर मोठा परिणाम झाला आहे.

अनेक कामे ठप्प झाली आहेत. खोदलेले रस्ते तसेच आहेत. त्याचा नागरिकांना त्रास होत आहे. रस्त्यांची कामे पावसाळ्यापूर्वी होणे आवश्यक असते. पावसाळ्यात रस्त्यांची कामे करता येत नाहीत. पावसाळा महिन्याभरावर येवून ठेपला आहे.  कामगार नसल्याने खोदून ठेवलेली रस्त्यांची कामे पूर्ण होतील की नाही असा प्रश्न आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने सर्व प्रशासन कोरोनाविरोधातील लढाई लढत आहे. प्रशासनाने कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आणण्यावर लक्ष केंद्रित केले आहे.

दरम्यान, आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच कोरोनाच्या पुन्हा प्रादुर्भाव वाढल्याने महापालिका उत्पन्नवर देखील परिणाम होणार आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे अनेकांच्या हाताला काम नाही. नागरिकांकडून मालमत्ता कराचा भरणा होण्याची शक्यता नाही. परिणामी, महापालिका उत्पन्नाला फटका बसणार आहे.

कामांचा वेग  मंदावला – राजन पाटील 

महापालिकेचे शहर अभियंता राजन पाटील म्हणाले, “शहरात सिमेंट काँक्रीटीकरण, डांबरीकरणाची  कामे मोठ्या प्रमाणात सुरू होती. पण, मनुष्यबळ कमी असल्याने कामे संथगतीने सुरू आहेत. कामांचा वेग  मंदावला आहे. पण, कोणतीही कामे बंद नाहीत. महामारीत कामे मुदतीत न झाल्यावर ठेकेदारांवर  कारवाई केली जात नाही. कोरोनाच्या पहिल्या लाटेत शासनाने सर्व विकास कामांना सरसकट सहा महिने मुदतवाढ दिली होती”.

पावसाळ्या पूर्वीची कामे चालू – विजय भोजने

प्रवक्ते विजय भोजने म्हणाले, “पावसाळ्या पूर्वीची कामे चालू आहेत. पावसाळ्यात रहदारीला अडथळा होणार नाही. त्यासाठी पावसाळी गटर नलिका जोडणे, चर करून ठेवणे, खड्डा असल्यास काँक्रीट करून घेण्याचे काम चालू आहे. 30 ते 40 टक्के कामगार आहेत. ज्यांच्याकडे कामगारांची कॉलनी, वाहतूक करण्याची सोय आहे, अशा मोठ्या ठेकेदारांची कामे सुरू आहेत.

भक्ती-शक्ती पुलाचे पेंटिंग, पावसाळा नलिका स्वच्छ करण्याचे काम सुरू आहे. डांगे चौकातील ग्रेडसेपरेटरचे काम चालू आहे. पाया खोदला जात आहे. पावसाळी गटर नलिका टाकण्याचे काम चालू आहे. पावसाळ्याला दीड महिन्यांचा कालावधी आहे. त्यामुळे बरीच कामे उरकतील. स्मार्ट सिटीचेही काम चालू आहे. जास्तीत जास्त कॉक्रीट रस्ते करून फुटपाथपर्यंत काम आणून ठेवायचे चालले आहे”.

 

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.