Solapur News : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सोलापुरात एक रुपया लिटर प्रमाणे पेट्रोलचे वाटप

एमपीसी न्यूज – भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज 131 वी जयंती आहे. यानिमित्त देशभर विविध उपक्रम राबवले जात आहेत. यातच सोलापूर येथे डॉ. आंबेडकर स्टुडन्टस आणि युथ पँथर्स या संघटनेच्या वतीने एक अनोखा उपक्रम राबविला जात आहे. पेट्रोलचे दर गगनाला भिडलेले असताना या संघटनेच्या वतीने केवळ एक रुपया प्रती लिटर प्रमाणे पेट्रोल दिले जात आहे.

सोलापूर शहरात 120.18 रुपये प्रती लिटर प्रमाणे पेट्रोल मिळत आहे. एवढे प्रचंड दर असताना डॉ. आंबेडकर स्टुडन्टस आणि युथ पँथर्स या संघटनेच्या वतीने एक रुपये प्रती लिटर प्रमाणे पेट्रोल वाटप करण्यात आले. वाढत्या पेट्रोल दरवाढीत नागरिकांना दिलासा देण्यासाठी सोलापूर येथे हा उपक्रम राबविण्यात आला. 500 नागरिकांना एक रुपया प्रती लिटर प्रमाणे पेट्रोल वाटप करण्यात आले.

एक रुपया प्रती लिटर प्रमाणे पेट्रोल मिळत असल्याची माहिती समजताच पेट्रोल पंपावर नागरिकांनी एकच गर्दी केली. मात्र त्यातील 500 लोकांना याचा लाभ मिळाला. आमच्यासारखी लहान संघटना 500 लोकांना एक रुपया प्रती लिटर प्रमाणे पेट्रोल वाटप करून दिलासा देऊ शकते तर सरकार देखील नागरिकांना दिलासा देऊ शकते. सरकारने नाग्रीकानन दिलासा द्यावा, अशा भावना संघटनेचे अध्यक्ष महेश सर्वगोड यांनी व्यक्त केल्या.

22 मार्च ते 6 एप्रिल या कालावधीत देशात पेट्रोल आणि डीझेल तब्बल 10 रुपयांनी वाढले. मुंबईत पेट्रोल 120.51 रुपये प्रती लिटर, डीझेल 104.77 रुपये प्रती लिटर आहे. दिल्लीत पेट्रोल 105.41 रुपये प्रती लिटर, डीझेल 96.67 रुपये प्रती लिटर आहे. 6 एप्रिल रोजी 80 पैशांनी पेट्रोल आणि डीझेल वाढले आणि या किमती तेंव्हापासून स्थिर आहेत.

मागील आठ दिवसांपासून पेट्रोल आणि डीझेल स्थिर आहे. परंतु सीएनजी आणि पीएनजीच्या दरांमध्ये मोठी वाढ झाली आहे. बुधवारी मुंबईत सीएनजी पाच रुपये तर पीएनजी 4.50 रुपये प्रती घन मीटर प्रमाणे वाढले आहे. गुरुवारी देशाची राजधानी दिल्लीत देखील सीएनजी 2.50 रुपये आणि पीएनजी 4.25 रुपये प्रती घन मीटर प्रमाणे वाढले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.