Famous singer, musician Bappi Lahari passed away : प्रसिद्ध गायक, संगीतकार बप्पी लहरी यांचं निधन

एमपीसी न्यूज : प्रसिद्ध गायक, संगीतकार बप्पी लहरी यांचं निधन झालं आहे. ते 70 वर्षांचे होते.  मुंबईच्या एका रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 

बप्पी लहरी यांचं खरं नाव अलोकेश लहरी होतं. त्यांचा जन्म 27 नोव्हेंबर 1952 रोजी जलपैगुडी पश्चिम बंगालमध्ये झाला होता. बप्पी लहरी यांनी हिंदी सिनेसृष्टीतील गाण्यांमध्ये पॉपचा तडका आणून भारतीय प्रेक्षकांना गाण्यांची एक हटके चव चाखायला मिळाली होती. बप्पी यांच्या गाण्यांनी, संगीताने भारतीय संगीत विश्वाला एक वेगळी ओळख दिली आहे.

 

1973 मध्ये ‘नन्हा शिकारी’ सिनेमात गाणं गाण्याची संधी त्यांना मिळाली होती. मात्र त्यानंतर 1975 मध्ये ‘जख्मी’ या सिनेमातून त्यांना खरी ओळख मिळाली. या सिनेमातून त्यांनी मोहम्मद रफी आणि किशोर कुमार सारख्या महान गायकांसोबत गाणं गायलं होतं. बप्पी लहरी आणि मिथुन चक्रवर्ती यांची जोडी चर्चेत राहिली. एकीकडे मिथुन यांचा डान्स तर बप्पी लहरी यांची पॉप, डिस्को गाणी असं कॉम्बिनेशन चांगलच रंगलं होतं.

बप्पी लहरी यांच्या काही हिट गाण्यांपैकी ‘याद आ रहा है’, ‘सुपर डान्सर’, ‘बॉम्बे से आया मेरा दोस्त’, ‘ऐसे जीना भी क्या जीना है’, ‘प्यार चाहिए मुझे जीने के लिए’, ‘रात बाकी’, ‘यार बिना चैन कहा रे’, ‘उह ला ला उह लाला’ ही आणि इतर बरीच गाणी आहेत. 80 आणि 90 च्या दशकातला काळ त्यांनी त्यांच्या गाण्यांनी चांगलाच गाजवला होता. हिंदीसह त्यांनी बंगाली, गुजराती, तामिळ, तेलुगू, कन्नड गाणी देखील गायली आहेत.

आत्तापर्यंत त्यांनी गायन आणि संगीत क्षेत्रातील काम सुरु ठेवलं होतं. 2020 मध्ये ‘बागी 3’ सिनेमातील भंकस हे गाणं त्यांचं हिंदी सिनेसृष्टीतील शेवटचं गाणं ठरलं. बप्पी यांच्यावर अनेक पुरस्कारांचाही वर्षाव झाला. 63 व्या फिल्मफेयर पुरस्कार सोहळ्यात त्यांना संगीत क्षेत्रातील कामगिरीसाठी जीवनगौरव पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.