Pune News : अखेर पुण्यात लसीकरणाचा शुभांरभ

कमला नेहरू रुग्णालयात पार पडला सोहळा

एमपीसी न्यूज : स्वदेशी बनावटीची भारतीय कंपनी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने तयार केलेल्या ‘कोव्हिशिल्ड’ लसीकरणाचा शुभारंभ आज सकाळी 11 वाजता कमला नेहरू रुग्णालयात संपन्न झाला. 

याप्रसंगी महापौर मुरलीधर मोहोळ, उपमहापौर सरस्वती शेंडगे, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, महापालिका आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त श्रीमती रूबल अग्रवाल, आरोग्य विभाग प्रमुख डॉ.आशिष भारती यांच्यासह नगरसेवक-नगरसेविका, डॉक्टर, नर्सेस आणि अन्य कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लसीकरण मोहीमेचा औपचारीक उद्घाटन सोहळा पुणे महापालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयात संपन्न झाला. महापालिका आणि खासगी मिळून 8 रुग्णालयांमध्ये प्रत्येकी 100 प्रमाणे 800 आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरणाला सुरूवात झाली आहे.

लसीकरणाची प्रक्रिया नेमकी अशी असणार….

पहिल्या टप्प्यासाठी महापालिका कार्यक्षेत्रातील सर्व आरोग्याधिकारी व कर्मचार्‍यांची यादी तयार करण्यात आली आहे. प्रत्येक बूथवर 1 लस टोचणारा, दोन पर्यवेक्षक आणि एक सुरक्षाकासह पाच जणांची टीम असणार आहे. कोव्हिल व्हॅक्सिनेशन पोर्टलवर नाव व नोंदणीकृत ओळखपत्र असलेल्यांना लसीकरणाचा दिनांक, वेळ याचा एसएमएस येणार आहे. तो एसएमएस पाहून संबंधित आरोग्य कर्मचाऱ्यांचे लेखी संमतीपत्र (लेटर ऑफ कन्सेन्ट) घेऊन डाव्या हाताच्या दंडावर लस दिली जाईल. त्यानंतर लस दिलेल्या प्रत्येक व्यक्तीला 30 मिनीटांसाठी विशेष पथकाच्या देखरेखीखाली ठेवले जाईल. काही लक्षणे किंवा गुंतागुंत आढळल्यास तातडीने रुग्णालयात भरती केले जाईल. कोणतीही लक्षणे, त्रास न जाणवल्यास संबंधित व्यक्तींना घरी सोडण्यात येणार आहे.

पुण्यातील खालील 8 रुग्णालयांमध्ये होणार लसणीकरण…

1) राजीव गांधी रुग्णालय, येरवडा

2) कमला नेहरू रुग्णालय, मंगळवार पेठ

3) ससून रुग्णालय, पुणे स्टेशन

4) सुतार दवाखाना, कोथरूड

5) दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल, एरंडवणा (खासगी)

6) रूबी हॉल क्लीनिक, ताडीवाला रस्ता (खासगी)

7) नोबल हॉस्पिटल, हडपसर (खासगी)

8) भारती हॉस्पिटल, धनकवडी (खासगी)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.