Pune News : सैन्यदलातील भरतीचे बनावट नियुक्तीपत्र देऊन 13 लाखांची फसवणूक

चौघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज : भारतीय सैन्य दलात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून आणि रेल्वे मध्ये तिकीट चेकर म्हणून नोकरी लावण्याचे आमिष दाखवून दोघा भावांची तब्बल 13 लाख 50 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. मुंढवा पोलीस स्टेशन मध्ये या प्रकरणी चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

भारत कृष्णा काटे (वय 41), राजेंद्र दिनकर संकपाळ, दयानंद जाधव आणि बी के सिंग अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या चौघांची नावे आहेत. याप्रकरणी सलमान गौसउद्दीन शेख (वय 21, करडखेर गाव, लव्हारा, उदगीर, लातूर) या तरुणाने तक्रार दिली आहे. ऑगस्ट दोन हजार वीस मध्ये हा प्रकार घडला.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, चारही आरोपींनी आपापसात संगनमत करून फिर्यादी यांना आर्मीमध्ये भरती करण्यासाठी सहा लाख रुपयांची मागणी केली होती. तर फिर्यादीचा भाऊ सोहेल शेख याला रेल्वे मध्ये तिकीट चेकर म्हणून भरती करण्यासाठी सात लाख रुपये मागितले होते.

त्यानंतर त्यांना वेळोवेळी दिल्ली, झांसी, रांची, लखनऊ, जबलपूर याठिकाणी बोलावले आणि भारतीय आर्मीचे बनावट नियुक्तीपत्र दिले. तसेच आर्मी ची बनावट वेबसाइट तयार करून तिचा गैरवापर करत दोघांकडून 13 लाख 50 हजार रुपये स्वीकारून त्यांची फसवणूक केली आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.